Coronavirus: मृत्यूच्याही दारातून परतला ‘हा’ बॉडीबिल्डर; डॉक्टारांनी सोडली होती याच्या जगण्याची आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 09:20 AM2020-05-29T09:20:24+5:302020-05-29T09:22:09+5:30
अलीकडेच ब्रिटनमध्ये एक बॉडीबिल्डरने कोरोनावर मात केली आहे पण ही घटना सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे
ब्रिटन – चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अख्ख्या जगावर संकट घोंगावत आहे. आतापर्यंत ५५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना आजारातून बचावलेल्यांचीही संख्या मोठी आहे. अगदी लहानशा चिमुकल्यापासून ते १०० वर्षाहून अधिक व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याची उदाहरणं आहेत.
अलीकडेच ब्रिटनमध्ये एक बॉडीबिल्डरने कोरोनावर मात केली आहे पण ही घटना सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. जगायची इच्छाशक्ती असली की समोर कितीही मोठं संकट येऊ द्या, त्याचा परिणाम काहीच होत नाही. हे बॉडीबिल्डरच्या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. वाचण्याची एक टक्काही गॅंरटी नसताना चक्क मृत्युच्या दारातून हा बॉडीबिल्डर पुन्हा परतला आहे.
स्टिव्ह बँकस असं या ४४ वर्षीय बॉडीबिल्डरचं नाव आहे. गेल्या २५ मार्च रोजी त्याला श्वास घेण्यास अडचण आल्याने रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्याला हार्ट, किडनी आणि श्वसनाची समस्या होती. त्याची प्रकृती इतकी खालावली की तो कोमात गेला. ब्रुमफिल्ड हॉस्पिटमध्ये त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. हा तरुण जिवंत राहील ही आशा खुद्द डॉक्टरांनी सोडून दिली होती.
९९ टक्के हा बॉडीबिल्डर जगेल याची सुतराम शक्यता नव्हती. डॉक्टरांनी त्याच्या घरच्यांनाही निरोप देण्याची तयारी केली. मात्र तब्बल ७ आठवड्यानंतर या रुग्णाने डोळे उघडले. हा चमत्कार पाहून डॉक्टर आणि नर्सही आवाक् झाल्या. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या रुग्णाच्या जगण्याच्या इच्छाशक्तीला सलाम केला. गेल्या २ महिन्यापासून तो रुग्णालयात बेडवर पडून असल्याने त्याची तब्येत ढासळली आहे. पण या कठीण काळात त्याने मृत्यूला चकवा देऊन पुन्हा परतल्याने सर्व डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.