श्वानांच्या कपड्यांवर हजारो पौंडांचा खर्च
By Admin | Published: January 11, 2017 12:56 AM2017-01-11T00:56:02+5:302017-01-11T00:56:02+5:30
स्कॉटलंडमधील ‘स्टाईल कॉन्शस’ महिलेने आपल्या सात श्वानांच्या कपड्यांवर हजारो पौंड खर्च केले.
लंडन : स्कॉटलंडमधील ‘स्टाईल कॉन्शस’ महिलेने आपल्या सात श्वानांच्या कपड्यांवर हजारो पौंड खर्च केले.
फिओना गॉर्डन (३१) यांना आपल्या पाळीव श्वानांना फॅशनेबल ठेवण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे फ्लोई, म्या, हमीश, अंगुस, थिओ, एली आणि इस्ला हे सात श्वान असून प्रत्येकाच्या पेहरावाची शैली आणि कपाट स्वतंत्र असावे यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्या पूर्णवेळ श्वानांची निगा राखतात.
‘२००३ मध्ये मला हा छंद जडला. तेव्हा जन्मजात ह्रदयविकार असलेली ‘बेल्ला’ ही कुत्री माझ्याकडे होती. तीचे वजन खूपच कमी होते. तिला मी बाहेर घेऊन जाई तेव्हा ती थंडीने कुडकूडे. त्यामुळे मी तिच्यासाठी छोटे झंपर आणि कोट घेतला. तिला उबदार वाटावे हा त्यामागचा हेतू होता’, असे गॉर्डन यांनी सांगितले. त्या आपल्या सात श्वानांसाठी खास पेहराव तयार करून घेतात. गॉर्डन यांच्या प्रत्येक श्वानाच्या पेहरावाची स्वतंत्र शैली आणि कपाट आहे, असे एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. या श्वानांचे कपडे अमेरिकेत शिवले जातात. एका टी-शर्टसाठी ५ पौंड आणि हाताने शिवलेल्या ड्रेससाठी ४५ पौंड एवढा खर्च येतो.