शिमला मिरची कापताना आवाज आला डराव डराव; महिलेला प्रश्न पडला आता काय कराव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 01:13 PM2020-02-17T13:13:37+5:302020-02-17T13:23:02+5:30
धक्कादायक घटनेची कृषी मंत्रालयाकडून गंभीर दखल; घटनेचा तपास सुरू
ओटावा: स्वयंपाक करण्यासाठी भाजी चिरत असताना कधी कधी किड दृष्टीस पडते. मग भाजी चिरणारी व्यक्ती लगेच ती किड बाजूला काढते आणि अधिक लक्ष देऊन भाजी चिरू लागते. मात्र तुम्ही कधी भाजी चिरताना बेडूक दृष्टीस पडल्याचं ऐकलंय? कॅनडामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला. स्वयंपाकासाठी भाजी चिरताना अचानक बेडूक दिसल्यानं दोघांना धक्काच बसला.
भाजी करण्यासाठी शिमला मिरची कापत असताना महिलेला बेडूक दिसला. मिरचीच्या आत मोठा जिवंत बेडूक दिसल्यानं दाम्पत्याला आश्चर्य वाटलं. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे दाम्पत्यानं शिमला मिरची विकत घेतली, त्यावेळी एकाही मिरचीला छिद्र नव्हतं. त्यामुळे मिरचीमध्ये इतका मोठा बेडूक सापडला कसा, असा प्रश्न दोघांना पडला. दाम्पत्यानं बेडकाला बाजूला काढून एका भांड्यात ठेवलं.
शिमला मिरचीमध्ये बेडूक सापडल्याची तक्रार दाम्पत्यानं सुपरमार्केटकडे केली. त्यानंतर हे प्रकरण थेट कृषी मंत्रालयापर्यंत पोहोचलं. सध्या मंत्रालयातल्या एका विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मिरचीला छिद्र नसताना बेडूक आत पोहोचलाच कसा, असा प्रश्न या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील पडला आहे. हा संपूर्ण प्रकार खाद्यपदार्थाशी संबंधित असल्यानं शिमला मिरची आणि बेडूक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.
दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या परिसरात यंदाच्या वर्षात भाज्यांमध्ये किटक सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांना भाज्यांमध्ये किडे, कोळी सापडले आहेत. त्यामुळेच कृषी मंत्रालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.