Corona Virus : कोरोना उपचारानंतर मुलाच्या डोळ्यांचा अचानक बदलला रंग, झाले निळे; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:18 PM2023-09-07T18:18:44+5:302023-09-07T18:31:57+5:30
Corona Virus : कोरोनावर उपचार केल्यानंतर 6 महिन्यांच्या बाळाच्या डोळांचा रंग बदलला. अचानक डोळे निळे झाले.
थायलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनावर उपचार केल्यानंतर 6 महिन्यांच्या बाळाच्या डोळ्यांचा रंग बदलला. अचानक डोळे निळे झाले. जेव्हा मुलाच्या आईने त्याचे डोळे पाहिले तेव्हा तिला धक्का बसला आणि तिने डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की मुलाच्या डोळ्यांचा रंग खरोखरच बदलला आहे. त्यांनाही आश्चर्य वाटलं.
मुलावर करण्यात आलेले उपचार बदलल्यानंतर डोळ्यांचा रंग बरा झाला. मुलाला कोरोनाच्या उपचारासाठी काही औषधं देण्यात आली होती, ज्याच्या दुष्परिणामांमुळे त्याच्या डोळ्यांचा रंग बदलला होता. ही एक अपवादात्मक घटना होती. मेडिकल जर्नल फ्रंटियर्स इन पीडियाट्रिक्सनुसार, थायलंडमध्ये राहणाऱ्या मुलाला ताप आणि खोकला होता.
बाळाला कोविड-19 ची लागण झाल्याचे तपासात समोर आले आहे. उपचारासाठी त्याला तीन दिवस फेवीपिरावीर देण्यात आलं. उपचाराने त्याची तब्येत सुधारली पण औषध सुरू केल्यानंतर 18 तासांनी त्याच्या डोळ्यांचा रंग बदलला. सर्वप्रथम, मुलाच्या आईला त्याच्या डोळ्यांच्या रंगात बदल झाल्याचं लक्षात आलं. त्याचे डोळे गडद तपकिरी होते ते नंतर निळे झाले. रंग बदलल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी मुलावर उपचार करणं बंद केलं.
औषध बंद केल्यानंतर पाच दिवसांनी मुलाचे डोळे पुन्हा तपकिरी झाले. त्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, मुलाची त्वचा, नखं, नाक आणि शरीराच्या इतर अवयवांच्या रंगात कोणताही बदल झालेला नाही. या प्रकरणात, डॉक्टर म्हणतात की, शरीरात बदल झाल्यानंतर, औषध बंद केली पाहिजेत. याआधी 2021 मध्ये एका व्यक्तीने तक्रार केली होती की फेवीपिरावीर घेतल्याने त्याचे तपकिरी डोळे निळे झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.