जबरदस्त जुग्गाड! दूध काढत असताना गायींना लावला गॉगल; शेतकरी झाले मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:33 PM2022-01-14T13:33:25+5:302022-01-14T13:33:37+5:30
दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्याची भन्नाट युक्ती; इतर शेतकऱ्यांनादेखील झाला फायदा
गायींना उत्तम खुराक मिळावा आणि त्यांनी चांगलं दूध द्यावं असं प्रत्येक गायी बाळगणाऱ्यांना वाटतं. गायींनी मुबलक दूध दिल्यास गोपालन करणाऱ्या कुटुंबाचा फायदा होतो. त्यामुळेच जास्त दूध देणाऱ्या गाय, म्हैशींची किंमत अधिक असते. मात्र या गायी, म्हैशी गरीब शेतकरी विकत घेऊ शकत नाही. अशा स्थितीत एका शेतकऱ्यानं जास्त दूध मिळवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली. त्यामुळे फार खर्च न करता दुधाचं उत्पादन वाढलं.
तुर्कस्तानातील एका शेतकऱ्यानं दूध उत्पादन वाढवण्यासाठी हायटेक जुगाड केला. त्यामुळे घरासमोर खुंटीला बांधलेली गाय आता अधिक दूध देऊ लागली आहे. आपण एखाद्या मोठ्या हिरव्यागार शेतात, मैदानात आहोत, असं गायीला वाटू लागलंय. चारा खाण्यासाठी आपण शेतात, मैदानात आल्याचं गायीला वाटत असल्यानं ती अधिक दूध देऊ लागली आहे.
इज्जत कोकाक नावाच्या शेतकऱ्यानं गायींच्या डोळ्यांवर वर्च्युअल रिऍलिटी गॉगल्स लावले आहेत. त्यामुळे गायींना आपण एखाद्या हिरव्यागार शेतात चरत असल्याचा भास होतो. अक्साराय शहरात वास्तव्यास असलेल्या कोकाक यांनी त्यांच्या दोन गायींच्या डोळ्यांवर वर्च्युअल रिऍलिटी गॉगल्स लावले. डोळ्यांसमोर दिसत असलेल्या सुखद दृश्यांचा परिणाम गायींच्या मानसिक स्थितीवर झाला. त्या अधिक दूध देऊ लागल्या. आधी २२ लीटर दूध देणाऱ्या गायी आता २७ लीटर दूध देऊ लागल्या. कोकाक यांनी त्यांच्या यशस्वी प्रयोगाची माहिती इतर शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर इतरांनीदेखील हा प्रयोग करून पाहिला. त्यांनाही सकारात्मक परिणाम दिसून आले.