तिनं लग्नात घातला ७ किलोमीटर लांबीचा गाऊन; या मुलीचं नाव आहे १०१९ अक्षरांचं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 07:35 AM2022-07-07T07:35:39+5:302022-07-07T07:35:53+5:30

मारिया परकेवा हे या तरुणीचं नाव. आपल्या लग्नाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या सौंदर्याला आणखी चार चाँद लागतील, असा पोशाख, ड्रेस निवडण्याचा प्रयत्न करीत असतो.

Cyprus Woman Breaks Guinness World Record for Longest Veil Ever, Stretching Over 7 km | तिनं लग्नात घातला ७ किलोमीटर लांबीचा गाऊन; या मुलीचं नाव आहे १०१९ अक्षरांचं!

तिनं लग्नात घातला ७ किलोमीटर लांबीचा गाऊन; या मुलीचं नाव आहे १०१९ अक्षरांचं!

googlenewsNext

कोणाचं काय स्वप्न असेल आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी कोण काय काय करेल, याचा खरंच काहीच भरवसा नाही. आता सायप्रसच्या या तरुणीचंच उदाहरण घ्या. आपलं लग्न एकदम हटके व्हावं, लोकांनी आणि नेटिझन्सनी आपलं नाव काढावं यासाठी या तरुणीनं काय करावं?..

मारिया परकेवा हे या तरुणीचं नाव. आपल्या लग्नाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या सौंदर्याला आणखी चार चाँद लागतील, असा पोशाख, ड्रेस निवडण्याचा प्रयत्न करीत असतो. मारियाही त्याला अपवाद नव्हती. तिनंही लग्नासाठी आपल्या आवडीप्रमाणे एक वेडिंग गाऊन प्रसिद्ध डिझायनरकडून बनवून घेतला. तिच्या याच गाऊननं तिला अख्ख्या जगात फेमस केलं. एवढंच नाही, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदलं गेलं. असं काय होतं या वेडिंग गाऊनमध्ये? - आजकाल आपण अनेकदा पाहातो, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक अभिनेत्री लांब पायघोळ गाऊन घालून येतात. या गाऊनचा मागचा भाग कितीतरी लांब असतो. मारियाचा गाऊनही तसाच होता. पण किती असावी तिच्या या वेडिंग ड्रेसची लांबी?.. - तब्बल सात किलोमीटर! ऐकून आश्चर्य वाटलं ना?.. तिनं हा गाऊन कसा परिधान केला असेल? सात किलोमीटरचा एवढा लांब गाऊन घालून ती कशी चालली असेल?.. असे अनेक प्रश्नही तुमच्यासमोर उभे राहिले असतील. हो, हा सगळा मामला तसा कठीणच होता. कारण हा गाऊन तिच्या अंगावर चढवण्यासाठी प्रशिक्षित मदतनिसांची मोठी फौज; तब्बल ३० जण तिच्या मदतीला होते, तरीही त्यासाठी तिला तब्बल सहा तास लागले. 

मारिया सांगते, आपलं लग्न एकदम शाही व्हावं, असं तर मला लहानपणापासून वाटत होतंच, पण आपण वर्ल्ड रेकॉर्ड करावं असंही मला वाटत होतं. माझं हे स्वप्न अखेर पूर्ण झालं. अशीच आणखी एक घटना श्रीलंकेमधील. तिथल्या एका मॉडेलनंही आपल्या लग्नात तब्बल २.३ किलोमीटर लांबीची साडी नेसली. एवढंच नाही, जिथं तिचं लग्न झालं, त्या कँडी शहरातल्या मुख्य रस्त्यावरून या साडीसह तिनं आपली शाही ‘मिरवणूक’ही काढली. इथेही तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल. एवढी २.३ किलोमीटर लांबीची साडी नेसून ही नवरी भर रस्त्यातून चालली कशी असेल? आपली साडी तिनं कशी आवरली, सावरली असेल? रस्त्यावरच्या ट्रॅफिकचं काय? तिच्या साडीवरून गाड्या, वाहनं गेल्या नाहीत काय? - बरोबरच आहे तुमचं. त्यासाठी या जोडप्यानं आणखी एक शक्कल लढवली होती. आपल्या या लग्नात ‘स्पेशल गेस्ट’ म्हणून काही शाळकरी मुला-मुलींना त्यांनी आमंत्रण दिलं होतं. काही किलोमीटर लांब असलेला तिच्या साडीचा पदर या मुलांनी उचलून धरला आणि त्यानंतर तिनं भर रस्त्यातून आपली मिरवणूक काढली. तब्बल साडेतीनशे मुलांनी यासाठी नवरीला मदत केली. पण, या हौसेचं मोल मॉडेल नवरी आणि तिच्या नवऱ्यालाही मोजावं लागलं. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. का? कारण तिच्या साडीचा पदर उचलण्यासाठी ज्या शेकडो मुलांना तिनं ‘कामाला’ लावलं होतं, त्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं. श्रीलंकेत आजपर्यंत कोणीही, कोणत्याही प्रसंगी एवढी लांब साडी नेसली नव्हती. याबाबतीत तिनं ‘विक्रम’ केला आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव जावं, संपूर्ण जगात आपण फेमस व्हावं अशी तिची इच्छा होती, पण तिच्या या कारनाम्यामुळे रेकॉर्ड राहिलं बाजूलाच, तिलाच नव्हे, तर तिच्या नवऱ्यालाही लग्नाच्या दिवशीच पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं.

या मुलीचं नाव आहे १०१९ अक्षरांचं!
अमेरिकेत राहणारी एक मुलगी. तिचं नाव कसं सांगावं? कारण हे नाव लिहिता, वाचताच येत नाही. आपली मुलगी जगात फेमस व्हावी म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचं नाव हेऽऽ भलंमोठं ठेवलं. १०१९ अक्षरांचं नाव. गिनेस बुकात या नावाची नोंद झाली, पण, आपलंच नाव पाठ करण्यासाठी या मुलीला आपलं नाव रेकॉर्ड करून अनेक महिने, अनंत वेळा ऐकावं लागलं. तुम्हाला हवंच असेल तिचं नाव तर हे घ्या.. Rhoshandiatellyneshiaunneveshenk Koyaanisquatsiuth Williams ! पण लक्षात घ्या, हे तिचं आधीचं नाव आहे. हे छोटं वाटलं म्हणून तिच्या आई-वडिलांनी यात आणखी अनेक अक्षरांची भर घातली! तिच्या या नावामुळे तिच्या बर्थ सर्टिफिकेटची लांबीही तब्बल २ फूट झाली!

Web Title: Cyprus Woman Breaks Guinness World Record for Longest Veil Ever, Stretching Over 7 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.