अजब! दहावीत मुलगा नापास होऊनही वडिलांनी जंगी पार्टी देऊन केलं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 10:02 AM2018-05-16T10:02:41+5:302018-05-16T10:02:41+5:30
मुलगा परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी जंगी पार्टी दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का?
भोपाळ- दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असते. करिअरची पुढील दिशा ठरविण्यासाठी दहावीच्या परीक्षेकडे विद्यार्थी विशेष लक्ष देतात. विद्यार्थ्यांचे आई-वडिलही मुलांच्या परीक्षेकडे लक्ष देतात. मुलाने परीक्षेत योग्य कामगिरी केली नाही तर मुलांप्रमाणे पालकांचीही निराशा होते. पण, मुलगा परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी जंगी पार्टी दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? अर्थातच याचं उत्तर नाही असं असेल. पण असं घडलं आहे मध्य प्रदेशमध्ये. मुलगा दहावी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी मिठाई वाटत व जंगी पार्टी देऊन सेलिब्रेशन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, फटाके फोडून, मिठाई वाटून वडिलांनी सेलिब्रेशन केलं.
सुरेंद्र कुमार व्यास असं या विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव असून ते शिवाजी वॉर्ड भागात राहतात. 'मी माझ्या मुलाला अशाप्रकारे प्रोत्साहन देतो. परीक्षेत नापास झाल्यावर मुलं तणावात जातात व त्या तणावातून टोकाचं पाऊलंही उचललं जातं. अगदी आयुष्य संपविण्यापर्यंत टोकाचं पाऊल मुलं उचलतात. बोर्डाची परीक्षा ही काही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही, असं मला मुलांना सांगायचं आहे. आयुष्यात खूप गोष्टी येतात, अशी भावना सुरेंद्र कुमार यांनी व्यक्त केली आहे. माझा मुलगा पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षेला बसेल असंही ते म्हणाले.
'वडिलांनी माझ्यासाठी केलेल्या सगळ्याचं मला खूप कौतुक आहे. पुढच्या वर्षी खूप अभ्यास करून मी दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळविण्याचं वचन दिलं आहे, असं परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी आशूने म्हटलं.