डॅरियल दोषी आहे, कारण? - हेअरस्टाइल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:37 AM2024-02-27T09:37:11+5:302024-02-27T09:37:58+5:30
शाळेला जाॅर्जच्या केसांच्या लांबीबद्दल तक्रार होती. शाळेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी कोणतीही हेअरस्टाइल करावी. हेअरस्टाइलला शाळेचा विरोध नाही.
शाळेत विद्यार्थ्यांना शाळेच्या शिस्तीनुसारच वागावं लागतं आणि जर विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली तर त्यांना शिक्षा होणारच. ही शिक्षा म्हणजे कोंबडा करणं, उठाबशा काढणं, वर्गात बाकावर उभं राहणं अशी किरकोळ स्वरूपाची असते. पण एका विद्यार्थ्याला मात्र शाळेने दिलेल्या शिक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागली. डॅरियल जाॅर्ज हा १८ वर्षांचा मुलगा. अमेरिकेतल्या ह्यूस्टन येथील ‘बार्बरस हिल हायस्कूल’ या शाळेत शिकतो. शाळेने जाॅर्ज याला १ ऑगस्ट २०२३ पासून शाळेत येण्यास मनाई केली होती. त्याचा गुन्हा म्हणजे त्याच्या डोक्यावरचे विशिष्ट स्टाइलने ठेवलेले केस. जाॅर्जच्या हेअरस्टाइलला ‘लाॅक्स’ असं म्हणतात. या प्रकारच्या केशरचनेत डोक्यावरील केस म्हणजे दोऱ्यांसारखे असतात. कृष्णवंशीय जाॅर्जच्या डोक्यावरही अशाच दोऱ्या आहेत आणि त्या डोक्याला चिटकल्यासारख्या दिसतात. ही लाॅक्स हेअरस्टाइल अमेरिकेत ‘प्रोटेक्टिव्ह हेअरस्टाइल (संरक्षणात्मक केशरचना) म्हणून ओळखली जाते. त्याच केशरचनेसाठी शाळेने मात्र जाॅर्जला शिक्षा केली. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठीच जाॅर्ज न्यायालयात गेला होता.
शाळेला जाॅर्जच्या केसांच्या लांबीबद्दल तक्रार होती. शाळेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी कोणतीही हेअरस्टाइल करावी. हेअरस्टाइलला शाळेचा विरोध नाही. शाळेचा नियम हा केसांच्या लांबीबद्दलचा आहे. मुलग्यांचे केस हे शर्टच्या काॅलरला लागतील, भुवयांच्या खाली येतील किंवा कानांच्या पाळ्यांखाली लोंबतील एवढे लांब नसावेत. त्यामुळे जाॅर्जनेही शाळेच्या शिस्तीनुसार केस कापावेत, असा शाळेचा आग्रह होता. पण जाॅर्जला मात्र शाळेचा नियम मान्य नव्हता. त्याने आपल्या केसांची लांबी काही कमी केली नाही. जाॅर्ज ऐकतच नाही म्हटल्यावर शाळेने त्याला शाळेत येण्यास मनाई केली. जाॅर्ज एकटा पडला. त्याला शाळेत जाऊन इतर मुलांसोबत शिकता येत नव्हतं. या अन्यायाविरुद्ध जाॅर्जने न्यायालयात दाद मागितली. हेअरस्टाइलवरून आपल्याला शाळेत येण्यापासून रोखणे म्हणजे ‘क्राऊन’ (CROWN) कायद्याचं उल्लंघन असं जाॅर्जचं म्हणणं होतं.
न्यायालयाने जाॅर्जच्या केसांबद्दल शाळेने घेतलेली भूमिका आणि जाॅर्जला केलेली शिक्षा योग्य असल्याचा निर्णय दिला. जाॅर्जला हा निकाल म्हणजे शाळेनंतर आता न्यायालयानेही आपल्यावर केलेला अन्याय वाटत आहे. विशिष्ट केशरचनेमुळे शाळेत येऊ न देणे ही कृती सप्टेंबर २०२३ पासून अंमलात आलेल्या ‘क्राऊन’ ॲक्टचे उल्लंघन आहे. क्राऊन या संक्षेपाचं पूर्ण रूप आहे ‘क्रिएटिंग अ रिस्पेक्टफुल ॲण्ड ओपन वर्ल्ड फाॅर नॅचरल हेअर’. अमेरिकेत विशिष्ट केसांवरून भेदाभेद केला जातो. हा कायदा शिक्षण, नोकरीत विशिष्ट वंशांच्या लोकांना केसांचा पोत, त्यांची नैसर्गिक केशरचना याच्या आधारे भेदभाव करून त्यांना शिक्षण, नोकरीची संधी नाकारण्यापासून प्रतिबंध करतो. कॅलिफोर्नियात हा कायदा पहिल्यांदा अस्तित्वात आला. आता हा कायदा अमेरिकेतल्या २२ राज्यांत विशिष्ट वंशाच्या विशिष्ट केशरचनेला कायदेशीर मान्यता देऊन त्यांच्या नैसर्गिक अधिकारांचं संरक्षण करतो. या कायद्याचा आधार घेतच जाॅर्जने आणि त्याच्या कुटुंबाने शाळेने केलेल्या शिक्षेविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. पण शाळेने मात्र आपली बाजू मांडताना आपण शाळेत विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नसल्याचं सांगितलं. उलट शाळेचा ब्रेड्स, लाॅक्स ट्विस्टस, बंटू नॉटस या कोणत्याही प्रकारच्या केशरचनेला विरोध नाही. फक्त केसांची लांबी शाळेने ठरवलेल्या नियमानुसारच हवी, असं शाळेचं म्हणणं आहे. जाॅर्जच्या वकील ॲलीन बुकर म्हणतात, ‘ब्रेड्स, लाॅक्स, ट्विस्टस या हेअरस्टाइल विशिष्ट लांबीपर्यंत केस वाढवल्याशिवाय करताच येत नाहीत. शाळा म्हणते त्या लांबीचे केस ठेवून या हेअरस्टाइल ठेवणं शक्यच नाही. त्यामुळे शाळेचा केसाच्या लांबीला नाही तर हेअरस्टाईललाच विरोध आहे, असं स्पष्ट दिसतं.'
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायलयाने क्राऊन कायद्यात केसांच्या लांबीचा स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे शाळेने केसाच्या लांबीवरून शिस्तीवर बोट ठेवलं असेल तर ते योग्य आहे, असं म्हटलं.
हा निर्णय ऐकल्यानंतर जाॅर्जला रडू कोसळलं. आता जाॅर्ज पुन्हा दुसऱ्या न्यायालयात जाऊन शाळेने केलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार आहे.
जाॅर्ज म्हणतो की...
शाळेला माझ्या हेअरस्टाइलबद्दल तक्रार आहे. केसांची लांबी हे शाळा सांगत असलेलं खोटं कारण आहे. माझी हेअरस्टाइल म्हणजे माझं फॅशन स्टेटमेंट नाही. माझ्या मुळांशी असलेलं माझं नातं आहे . या हेअरस्टाइलद्वारे मी माझ्या पूर्वजांच्या जवळ जाऊ शकतो. हे केस कापले तर मी माझ्या लोकांपासून दूर जाईन. मी मनाने खचून गेलो आहे. पण म्हणून मी शाळा म्हणते तसे केस कापणार नाही. केस कापून हा अन्याय मी का सहन करावा?