आजच्या दिवशीच भारताच्या शोधात निघाला होता कोलंबस, चुकून भलतीकडेच पोहोचला....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 10:17 AM2020-08-04T10:17:50+5:302020-08-04T10:38:05+5:30
कोलंबसने अमेरिकन बेटांना भारत मानलं आणि त्याला इंडीज असं नावही दिलं. कोलंबस चुकीचा होता. पण तो आयुष्यभर याचा गैरसमजासोबत जगला की, त्याने भारत शोधला.
इटलीचा नाविक क्रिस्टोफर कोलंबस आजच्याच दिवश भारताच्या शोधात समुद्रामार्गे निघाला होता. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, कोलंबसने १४९२ मध्ये आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, ही तारीख ३ ऑगस्ट होती. ३ ऑगस्ट १४९२ ला क्रिस्टोफर कोलंबस भारताच्या शोधात निघाल आणि चुकून त्याने अमेरिकन बेटांचा शोध लावला.
कोलंबसने अमेरिकन बेटांना भारत मानलं आणि त्याला इंडीज असं नावही दिलं. कोलंबस चुकीचा होता. पण तो आयुष्यभर याचा गैरसमजासोबत जगला की, त्याने भारत शोधला. त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला हे कळू शकले नाही की, तो अमेरिकेला भारत समजून बसलाय. चला जाणून घेऊ कोलंबसच्या समुद्र प्रवासाची रोमांचक माहिती.
क्रिस्टोफर कोलंबसचा जन्म १४५१ मध्ये जिनोआमध्ये झाला होता. कोलंबसला पुढे समुद्र प्रवासांची चटक लागली आणि यालाच त्याने आपला रोजगार बनवलं. कोलंबसवेळी यूरोपमधील व्यापारी भारतासहीत आशियातील अनेक देशांमध्ये व्यापार करत होते. जमिनीमार्गे येऊन ते यूरोप देशांना आपला माल विकत होते आणि येथून मसाले घेऊन जात होते. इराण आणि अफगाणिस्तान मार्गे हा व्यापार होत होता. १४५३ मध्ये या भागात मुस्लिम तुर्कानी साम्राज्य स्थापित झालं. ज्यांनी यूरोपीय व्यापाऱ्यांचा मार्ग बंद केला. आशियातील यूरोपचा व्यापार बंद झाला. त्यामुळे व्यापारी हैराण झाले.
याचदरम्यान कोलंबसच्या मनात समुद्रामार्गे भारतात जाण्याचा विचार आला. हे कुणालाही माहीत नव्हतं की, तेथून भारत किती दूर आहे आणि कोणत्या दिशेने आहे. पण कोलंबसला त्याच्या ज्ञानावर विश्वास होता. त्याला विश्वास होता की, समुद्रात पश्चिमच्या मार्गाने गेलं तर भारतात पोहोचता येतं. पण त्याच्या या गोष्टीवर विश्वास ठेवणारं कुणी नव्हतं.
कोलंबसला प्रवासासाठी पैशांची गरज होती आणि लोकही हवे होते. आपला विचार घेऊन तो पोर्तुगालचया राजाकडे गेला. पण राजाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर स्पेनच्या शासकांनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि प्रवासाचा खर्च उचलण्यासाठी तयार झाले. केवळ पैसा मिळून भागणार नव्हतं. कोलंबसच्या अडचणी काही कमी नव्हत्या. त्याच्यासोबत जाण्यासाठी कुणीही नाविक तयार नव्हता. कुणाचाही कोलंबसवर विश्वास नव्हता. त्यावेळी लोकांना वाटत होतं की, पृथ्वी चपटी आहे आणि ते समुद्रामार्गे प्रवासाला निघाले तर एक दिवस असा येईल जिथे समुद्र संपेल आणि ते खाली पडतील.
मोठ्या मुश्किलीने कोलंबसने ९० नाविक तयार केले. ३ ऑगस्ट १४९२ ला कोलंबसने तीन जहाजे घेऊन स्पेनमधून आपल्या प्रवासा सुरूवात केली. अनेक आठवडे झाले तर प्रवास काही संपला नाही. त्यामुळे नाविक घाबरले होते. अनेक नाविक परत जाण्याचा विचार करत होते. पण कोलंबस तयार नव्हता. इतकेच नाही तर नविकांनी कोलंबसला जीवे मारण्याची धमकी देणेही सुरू केले होते. कोलंबसने कसंतरी त्यांना काही दिवस प्रवास करण्यासाठी तयार केलं.
९ ऑक्टोबर १४९२ ला कोलंबसला आकाशात पक्षी दिसू लागले. त्याने त्या दिशेनेच जहाजे वळवण्यास सांगितली. १२ ऑक्टोबर १४९२ ला कोलंबसची जहाजे जमिनीवर पोहोचली. कोलंबसला वाटलं तो भारतात पोहोचला. पण तो बहामासचं बेट सॅन सल्वाडोरला पोहोचला होता. कोलंबस तिथे ५ महिने थांबला. या काळात त्याने अनेक कॅरेबियन बेटांचा शोध लावला. ज्यात जुआना(क्यूबा) आणि हिस्पानिओलांचा समावेश होता.
कोलंबसला इथे बरीच संपत्ती मिळाली. आपले ४० माणसे तिथेच सोडून तो स्पेनला परत गेला. १५ मार्च १४९३ ला कोलंबस स्पेनला पोहोचला. त्याचं भव्य स्वागत झालं. स्पेनच्या राजाने त्याला त्याने शोधलेल्या देशांचं गव्हर्नर केलं. त्यानंतर मृत्यूआधी कोलंबसने तीन वेळा अमेरिकन बेटांचा प्रवास केला. पण त्याला शेवटपर्यंत हे माहीत नव्हतं की, ज्या देशाला त्याने शोधलं तो भारत नाही तर अमेरिका आहे.