एक असा रहस्यमय समुद्र ज्यात कुणीही बुडू शकत नाही, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:47 AM2024-04-12T10:47:44+5:302024-04-12T10:48:16+5:30
डेड सी ची सगळ्यात खास बाब म्हणजे यात कुणीही बुडत नाही. कारण यात मिठाचं प्रमाण इतकं जास्त आहे की, तुम्ही यातील पाण्यावर झोपले तरी पाण्यात बुडणार नाहीत.
पृथ्वी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना आश्चर्यचकीत करतात. काही अशी ठिकाणं आहेत जी बघून त्यांवर विश्वासही बसत नाही. असंच एक रहस्य ठिकाण इस्त्राइल आणि जॉर्डनच्या मधे आहे ते म्हणजे डेड सी म्हणजे मृत सागर. डेड सी आपल्या अनेक गोष्टींमुळे नेहमीच खास राहिला आहे. डेड सी ची सगळ्यात खास बाब म्हणजे यात कुणीही बुडत नाही. कारण यात मिठाचं प्रमाण इतकं जास्त आहे की, तुम्ही यातील पाण्यावर झोपले तरी पाण्यात बुडणार नाहीत.
एका बाजूला इस्त्राईल दुसऱ्या बाजूला जॉर्डनचे सुंदर डोंगर आणि वेस्ट बॅंकने वेढलेला डेड सी चा नजारा डोळे दिपवणारा आहे. डेड सी पृथ्वीवीरल सगळ्यात खाली असलेला जलाशय आहे. हा समुद्र सपाटीपासून 400 मीटर खाली आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या जलाशयाला डेड सी असं नाव का पडलं? तर याचं कारण आहे की, यात मीठ जास्त असल्याने यात कोणताही जीव किंवा वनस्पती जिवंत राहत नाही. यात 35 टक्के मीठ आहे. इतक्या जास्त मिठाच्या पाण्यात ना कोणतं झाड उगवतं ना कोणता मासा जिवंत राहतो. यातील पाणी सामान्य समुद्रातील पाण्यापेक्षा 10 पटीने जास्त खारट आहे.
डेड सी मधील मीठ येथील वाळू आणि दगडांवर थर बनवून जमा झालं आहे. सोडिअम क्लोराइड असल्याने हे पाणी चमकत राहतं. अनेक पर्यटक इथे स्वीमिंग करण्यासाठी आणि यातील औषधी गुणांचा फायदा मिळवण्यासाठी येतात. डेड सी मधील मातीमध्ये त्वचेसाठी फायदेशीर हायएल्युरोनिक अॅसिड आणि अनेक खनिज असतात. इथे येणारे लोक शरीरावर मातीचा लेप लावून उन्ह घेतात.
इस्त्राईलमधील हा डेड सी बघण्यासाठी जगाच्या वेगवेगळ्या भागातून भरपूर लोक येतात. डेड सी च्या आजाबाजूल अनेक आलिशान रिसॉर्ट आहेत. जे फार महागडेही आहेत. पण सध्या इस्त्राईल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इथे येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे आणि हॉटेल्सचे भावही कमी झाले आहेत.