देवी - देवतांच्या जन्म, मृत्यूच्या तारखा सांगा, RTI मुळे अधिकारी धर्मसंकटात
By Admin | Published: February 18, 2017 09:45 AM2017-02-18T09:45:49+5:302017-02-18T09:49:57+5:30
इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी आरटीआय अंतर्गत राम, रावण, ब्रम्हा, विष्णु यांच्यासहित एकूण 70 देवी, देवतांच्या जन्म आणि मृत्यूची माहिती मागवण्यात आली आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आरटीआयमध्ये मागण्यात आलेल्या देवी - देवतांच्या जन्म, मृत्यूच्या तारखांचा शोध घेण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी सध्या देवी - देवतांचा इतिहास शोधण्याचं काम करत आहेत. अधिका-यांसाठी हे काम एकीकडे आव्हानात्मक असताना दुसरीकडे मात्र त्यांची चांगलीच गोची झाली आहे. हेच कारण आहे की, आरटीआय टाकून दीड महिना उलटला तरी याची माहिती अद्याप पाठवण्यात आलेली नाही. नागपूरमधील मनोज यांनी आरटीआयद्वारे ही माहिती मागितली आणि अधिका-यांसमोर धर्मसंकटच उभं राहिलं.
मनोज यांनी इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी आरटीआय अंतर्गत राम, रावण, ब्रम्हा, विष्णु यांच्यासहित एकूण 70 देवी, देवतांच्या जन्म आणि मृत्यूची माहिती मागितली आहे. यामध्ये त्यांनी राम, कृष्ण, विष्णु, ब्रम्हा, महादेव शंकर, हनुमान, शनी देव, नारद, रावण यांच्या जन्म, मृत्यूची तारखा आणि ठिकाणांची माहिती मागण्यात आली आहे. तसंच दुर्गा, लक्ष्मी, पार्वती, शारदा, वाल्मिकी ऋषी, गौतम बुद्ध यांच्या जन्म, मृत्यूची माहिती मागितली आहे.
देशभरात या देवी - देवतांची मंदिरे असल्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने संबंधित शहरातील केंद्रांना माहिती पुरवण्यास सांगितलं आहे. काही विभागांनी आपल्याकडे याचं काहीच उत्तर नसल्याचं कळवलं आहे. तर काहींनी आरटीआयची प्रत तशीच्या तशी परत पाठवली आहे. मात्र जी ठिकाणे देवी, देवतांचं जन्मस्थळ मानली जात आहेत, तेथील केंद्र माहिती दिल्याने लोकांच्या श्रद्धेला धक्का लागण्याच्या भीतीने उत्तर देणं कठीण असल्याचं सांगत आहेत.