स्वप्नांना वय नसतं! या ट्रॅव्हलरने ६०व्या वर्षी पूर्ण केला दिल्ली ते लंडन प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:17 PM2019-03-15T13:17:41+5:302019-03-15T13:29:39+5:30
आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण फार कमी लोकं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना बघू शकतात. काही यासाठी वेळ नसण्याचं कारण सांगतात तर काही वय झालं म्हणून टाळतात.
(Image Credit : scoopwhoop.com)
आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण फार कमी लोकं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना बघू शकतात. काही यासाठी वेळ नसण्याचं कारण सांगतात तर काही वय झालं म्हणून टाळतात. अशा लोकांना टर्बन ट्रॅव्हलर नावाने प्रसिद्ध या व्यक्तीकडून काहीतरी शिकायला हवं. या व्यक्तीने ६०व्या वर्षी दिल्ली ते लंडन असा प्रवास केला. तुम्ही म्हणाल यात काय मोठेपणा? तर या व्यक्तीने दिल्ली ते लंडन हा प्रवास कारने केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काहीतरी करण्याचं स्वप्न या व्यक्तीने तरूणपणी पाहिलं होतं.
दिल्ली ते लंडन कारने प्रवास करणाऱ्या या जिगरबाज व्यक्तीचं नाव आहे अमरजीत चावला. त्यांनी ही रोड ट्रिप ४० हजार किलोमीटरची केली. जर फ्लाइटने हा प्रवास केला तर हे अंतर ६५०० किलोमीटर इतकं पडतं. पण असं करण्यामागे एक स्वप्न आहे जे त्यांनी वयाच्या २०व्या वर्षी पाहिलं होतं.
अमरजीत चावला यांनी त्यांच्या वयाच्या २०व्या वर्षी कारने लंडनपर्यंत जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना परवानगी दिली नव्हती. त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि ते त्यांच्या बिझनेसला वाढवण्यात बिझी झालेत.
पण अमरजीत हे त्यांचं स्वप्न कधी विसरले नाहीत. त्यांना त्यांच्या स्वप्नाची आठवण सतत येत होती. त्यामुळे त्यांनी या प्रवासासाठी ते हळूहळू पैसे जमवत होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी त्यांचं २०व्या वर्षातील स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी या प्रवासाची सुरूवात दिल्लीच्या बंगला साहिब गुरूद्वारापासून सुरू केली होती. आणि १३५ दिवसांचा त्यांचा हा प्रवास लंडनमधील एका गुरूद्वारावर संपला. यादरम्यान त्यांनी ३० देशांचा प्रवास केला. रस्त्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणी आल्या, पण त्या दूर करण्यासाठी तेथील लोकांनी अमरजीत यांची सढळ हाताने मदत केली.
या प्रवासाबाबत अमरजीत यांनी सांगितले की, 'मी ठरवले होते की, असं काहीतरी करायचंय जेणेकरून लोक मला मी मेल्यावरही लक्षात ठेवतील. आज हा प्रवास पूर्ण करून मला फार जास्त आनंद होत आहे. मला हा आनंद शब्दात व्यक्ती करता येत नाहीये. मी स्वत:ला फार श्रीमंत समजतो आहे. कारण मी जे कमावलं ते कुणीही चोरून घेऊ शकत नाही. माझ्याकडे अनुभवांचा खजिना आहे'.
हॉलिवूड स्टार अर्नॉल्डसोबत झाली भेट
या प्रवासादरम्यान अमरजीत यांची भेट प्रसिद्ध हॉलिवूड अॅक्शन हिरो अर्नॉल्ड श्वार्ज़नेगर यांच्याशी झाली. त्यांनी अमरजीतच्या कारवर ऑटोग्राफही दिला होता. तसे त्यांच्या कारवर या प्रवासादरम्यान भेटलेल्या सर्वांचे ऑटोग्राफ आहेत. त्यांचा हा प्रवास ७ जुलै २०१८ ला सुरू झाला होता. आणि २३ फेब्रुवारीला संपला.