...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 06:57 PM2019-04-04T18:57:25+5:302019-04-04T18:58:15+5:30

चोराला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची युक्ती

Delhi police pull April fool prank to nab ATM thief | ...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर

...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर

नवी दिल्ली: एटीएमचोराला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अजब युक्ती केली. चोराला पकडण्यासाठी पोलीस स्वत: चोर झाले आणि 'ऑपरेशन एप्रिल फूल' सुरू करण्यात आलं. या ऑपरेशन अंतर्गत पोलिसांनी चोराची सर्व गुपितं, आडमार्ग जाणून घेतले आणि योग्य संधी मिळताच 'एप्रिल फूल' म्हणत त्याला बेड्या ठोकल्या.

दिल्ली पोलीस दलातील निरीक्षक नवीन मलिक यांनी 'ऑपरेशन एप्रिल फूल' यशस्वी केलं. यासाठी पोलीस दलातील सात जणांनी कुर्ता आणि लुंगी परिधान केली. हे सर्व पोलीस 45 वर्षांच्या अस्लमला पकडण्यासाठी सज्ज झाले. आपण चोरच असल्याचं भासवत हे सर्व जण अस्लमच्या टोळीत सामील झाले. यानंतर एटीएम कसं पळवायचं, पकडलो गेल्यास सहजपणे जामीन कसा मिळवायचा, याबद्दलचं सर्व कौशल्य अस्लमनं त्यांना शिकवलं. अस्लमकडून आवश्यक माहिती मिळाल्यावर अचानक हेड कॉन्स्टेबल 'एप्रिल फूल' ओरडला आणि त्याच्या साथीदारांनी लगेचच अस्लमला अटक केली. 

अस्लमनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी ठरलो, अशी माहिती द्वारकाचे पोलीस उपायुक्त अँटो अल्फोन्स यांनी दिली. अस्लमनं आतापर्यंत राजस्थान, कर्नाटक आणि कानपूरमधील एटीएम पळवल्याचं पोलिसांनी सांगितलं. अस्लमची एक टोळी यामध्ये सक्रिय असल्याचंही ते म्हणाले. 'एटीएम दोन प्रकारे लावण्यात येतं. एका प्रकारात एटीएम नट बोल्टच्या मदतीनं जमिनीला लावलं जातं. तर दुसऱ्या प्रकारात शक्तीशाली गमच्या मदतीनं जमिनीला चिकटवण्यात येतं. यातील दुसऱ्या प्रकारातलं एटीएम पळवणं थोडं सोपं असतं,' अशी माहिती पोलिसांनी दिली. 

अस्लम कशा पद्धतीनं एटीएम पळवायचा, याची माहितीदेखील यावेळी पोलिसांनी सांगितली. 'फॉर्च्युनर गाडी घेऊन आलेली एखादी व्यक्ती एटीएम घेऊन पळून जाईल, अशी कल्पना कोणीही करणार नाही. अस्लम याचाच फायदा घ्यायचा. तो अवघ्या काही सेकंदांमध्ये एटीएमच्या भोवती एक बेल्ट लावायचा आणि मेकशिफ्ट पुलीच्या मदतीनं एटीएम खेचायला सुरुवात करायचा. यानंतर कारचा ऍक्सिलेटर देऊन एटीएम पळवायचा,' असं पोलिसांनी सांगितलं. 
 

Web Title: Delhi police pull April fool prank to nab ATM thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.