येथे विवाहित स्त्रिया अविवाहित तरुणांना काठीने मारतात, धक्कादायक आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:56 PM2022-04-20T18:56:10+5:302022-04-20T18:58:41+5:30

यात्रोत्सवात अविवाहित पुरुषांना (Unmarried Men) काठीनं फटका मारला जातो. या प्रकारानंतर या तरुणांचा लवकर विवाह होतो, असं मानलं जातं.

dhingra gawar fair in Jodhpur where married women beat unmarried men | येथे विवाहित स्त्रिया अविवाहित तरुणांना काठीने मारतात, धक्कादायक आहे कारण

येथे विवाहित स्त्रिया अविवाहित तरुणांना काठीने मारतात, धक्कादायक आहे कारण

Next

आपल्या देशात अनेक धार्मिक रुढी, परंपरा (Tradition) आहेत. शेकडो वर्षांपासून या रुढी, परंपरा जपल्या जात आहे. दरवर्षी गावोगावी यात्रा, जत्रांचं आयोजन केलं जातं. प्रत्येक यात्रा, जत्रेचं खास अशी परंपरा आणि वैशिष्ट्य असतं. अर्थात हे वैशिष्ट्य धार्मिक गोष्टींशी निगडित असतं. राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर येथील यात्रा अशीच काहीशी अनोखी म्हणता येईल. नुकतीच ही यात्रा पार पडली. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रोत्सवात अविवाहित पुरुषांना (Unmarried Men) काठीनं फटका मारला जातो. या प्रकारानंतर या तरुणांचा लवकर विवाह होतो, असं मानलं जातं. याबाबतची माहिती `आज तक`ने दिली आहे.

राजस्थानमधल्या जोधपूर (Jodhpur) येथे जगातल्या सर्वांत अनोख्या यात्रेचं आयोजन केलं जातं. येथे 16 दिवसांच्या पूजेनंतर विवाहित महिला (Married Women) रात्रीच्यावेळी वेगवेगळे मुखवटे परिधान करून, वेगवेगळी रूपं घेऊन रस्त्यावर उतरतात. याला बेंतमार असं म्हणतात. प्राचीन काळापासून सुरू असलेली ही परंपरा येथील लोकांनी अजूनही जपली आहे. या यात्रेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, यात्रेदरम्यान भावजय आपल्या दीराला किंवा अन्य अविवाहित तरुणांना प्रेमानं काठीनं फटका मारते आणि हा तरुण अविवाहित आहे, असं सांगते. यानंतर संबंधित तरुणाचा लवकर विवाह (Marriage) होतो. विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान रात्रभर महिला हातात काठी घेऊन शहरातल्या रस्त्यांवर फिरत असतात. एखादा पुरुष समोर आल्यास त्या काठीनं त्याला मारतात.

या यात्रेला धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जोधपूर या शहराची स्थापना १४५९ मध्ये राव जोधा यांनी केली होती. तेव्हापासून येथे धींगा गौर पूजन केलं जातं. या पूजेला ५६३ वर्षांची परंपरा आहे. माता पार्वतीने सती जाण्यापूर्वी धींग गौर रुपात दुसरा जन्म घेतला होता, असं मानलं जातं. त्यामुळे या भागात धींगा गौर पूजन केलं जातं. हे व्रत करणारी महिला दिवसात एकदाच जेवण करते. तसेच पार्वती मातेला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. ज्या महिला हे व्रत करतात, त्यांच्या हातावर एक धागा बांधलेला असतो. त्याला १६ ठिकाणी कुंकू लावलेलं असतं. या यात्रोत्सवादरम्यान सलग १६ दिवस धींगा गौर मातेचं पूजन केलं जातं. 16 व्या दिवशी सर्व महिला रात्रभर घराबाहेर राहतात. वेगवेगळ्यावेळी धींगा गौरीची आरती केली जाते. त्यानंतर वेगवेगळी रूपं अर्थात सोंगं (Masquerade) घेऊन या महिला रात्रभर शहरातील रस्त्यांवर फिरतात.

जगभरात केवळ जोधपूरमध्येच धींगा गौर पूजन आणि यात्रेचं आयोजन केलं जातं. हा उत्सव पाहण्यासाठी केवळ राजस्थानमधलेच नाहीतर जगभरातले लोक जोधपूरला येतात. विशेष म्हणजे, धींगा गौर पूजन करणाऱ्या महिला दिवसातले १२ तास निर्जळी उपवास करतात.

Web Title: dhingra gawar fair in Jodhpur where married women beat unmarried men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.