अंबानींच्या घरातल्या कचऱ्याची अशी होते विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 01:15 PM2017-11-16T13:15:53+5:302017-11-16T14:23:58+5:30
आता अंबानींचं घर म्हणजे कचरा पण तेवढाच निघत असणार. मग पाहूया त्याची विल्हेवाट कशी लावली जाते.
मुंबई : जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना केले जाणारे भारतातले प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी विविध कारणांनी प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी त्यांच्या चालकाला असलेला लाखो रुपयांचा पगार ऐकून सारेच थक्क झाले होते. आताही अशीच एक बातमी समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घरातून तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने लावली जाते, कचऱ्याच्या विघटनातूनही ते एकप्रकारची निसर्गाची होणारी हानी कमी करत आहेत.
आपल्या घरातूनच इतका कचरा बाहेर पडत असतो, त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसरही खराब होतो. पण टाकाऊपासून टिकाऊ बनवायला शिकलो तरच एखाद्या वस्तूचा पुरेपुर वापर झाला असं म्हणता येईल. मुकेश अंबानी यांचं घर पाहता आणि तिकडे राहणारी माणसं पाहता साहजिकच त्यांच्या घरातून भरपूर कचरा बाहेर पडत असणार. त्यांच्या घरातील सदस्यांव्यतिरिक्त जवळपास ६०० नोकर त्यांच्या घरात राबतात. यावरुनच आपण त्यांच्या घराची व्यापकता समजू शकतो. मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्यापासून ऊर्जा निर्माण केली पाहिजे असं अंबानी कुटुंबाला वाटतं. म्हणूनच ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तांत्रिक पद्धतीने कचऱ्यापासून वीजनिर्मिती करतात. सध्या आपल्याकडे विजेचा तुटवडा आहे. वीजनिर्मितीसाठी लागणारी साधनं ही येत्या काही वर्षात संपुष्टात येण्याची भिती व्यक्त करण्यात येतेय. अशा काळात आपल्याकडे असलेल्या साधनांचाच वापर करून जर आपण वीजनिर्मिती केली तर नैसर्गिक साधनं संपुष्टात येण्याची भीतीच उरणार नाही. म्हणूनच मुकेश अंबानी यांच्या घरातून बाहेर पडणारा कचरा कचऱ्या डब्यात न जाता त्याची वीजनिर्मिती करण्यात येते.
ओला आणि सुखा कचरा अशा पद्धतीने वर्गीकरण करून आधुनिक तांत्रिक पद्धतीने वीजनिर्मिती केली जाते आणि ही वीज त्यांच्याच घरात वापरली जाते. अंबांनी यांच्या घराची व्यापकता पाहता ही संपूर्ण घरासाठी ही वीज पुरत नसली तरीही थोड्याफार प्रमाणात या वीजेचा उपयोग होतो.