तीन महिन्यांत ५९ गुन्ह्यांची उकल
By admin | Published: July 11, 2015 02:21 AM2015-07-11T02:21:05+5:302015-07-11T02:21:05+5:30
रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सुरू केलेल्या व्हॉट्स अॅप हेल्पलाइनचा पोलिसांना फायदा होत असून, गेल्या तीन महिन्यांत या हेल्पलाइनमुळे ५९ छोट्या-मोठ्या गुन्ह्यांची
मुंबई : रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सुरू केलेल्या व्हॉट्स अॅप हेल्पलाइनचा पोलिसांना फायदा होत असून, गेल्या तीन महिन्यांत या हेल्पलाइनमुळे ५९ छोट्या-मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबईबरोबरच राज्यातील अनेक भागांतून या हेल्पलाइनवर मदतीसाठी संपर्क साधण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी, प्रवासात घडलेल्या घटनेचे फोटो, व्हिडीओ पाठवता यावेत यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) ९८३३३१२२२२ हा निर्भया व्हॉट्स अॅप हेल्पलाइन नंबर उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये छेडछाड, फोनवरून त्रास देणे, रेल्वेसंदर्भात विविध तक्रारी, बेपत्ता प्रवासी यांची माहिती देण्यात येते. ९ मार्च रोजी व्हॉट्स अॅप हेल्पलाइन नंबर सुरू केल्यानंतर सुरुवातीलाच ५00पेक्षा अधिक मेसेज आले. या संदेशांचा आकडा सुरुवातीच्या १० दिवसांतच तब्बल १२ हजार ४0९ एवढा होता आणि त्यानंतर हा आकडा वाढतच गेला. कारण या क्रमांकावर देशभरातून संदेश येत असत. पण हा हेल्पलाइन नंबर मुंबईपुरताच असल्याचा प्रसार केल्यानंतर हे प्रमाण कमी झाले आणि त्यानुसार मदतीसाठी मॅसेज हेल्पलाइनवर येऊ लागले. गेल्या तीन महिन्यांत ५९ गुन्ह्यांची उकल या निर्भया व्हॉट्स अॅप हेल्पलाइनद्वारे करण्यात आल्याचे जीआरपीचे जनसंपर्क अधिकारी रितेश आहेर यांनी सांगितले. मुंबई विभागापुरतीच जरी हेल्पलाइन मर्यादित असली तरी राज्यातील काही भागांतून या हेल्पलाइनवर मदतीसाठी विचारणा होते. त्यानुसार त्या-त्या भागातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा सोडवला जातो, असे अहेर यांनी सांगितले.
अत्याचार, छेडछाड, ट्रेनच्या महिला डब्यातील हाणामारी यांसह अन्य गुन्ह्यांची उकल केली जाते, असे ते म्हणाले.