डॉक्टरांनी दिले तिघांना जीवनदान
By admin | Published: January 25, 2016 01:40 AM2016-01-25T01:40:34+5:302016-01-25T01:40:34+5:30
नवी मुंबईतील एका पशुवैद्यकीय तज्ज्ञाने अवयवदान केल्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या ३७ वर्षीय डॉक्टरांना २३ जानेवारीला
मुंबई : नवी मुंबईतील एका पशुवैद्यकीय तज्ज्ञाने अवयवदान केल्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या ३७ वर्षीय डॉक्टरांना २३ जानेवारीला बाईकवरून जाताना ब्रेनस्ट्रोकचा अॅटॅक आला. त्यामुळे ते बाईकवरून पडले. त्यानंतर तत्काळ त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने मूत्रपिंडे आणि यकृताचे दान करण्यात आले.
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या वेळी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे प्रशासक पी. के. शशांकर यांनी दिली. सायंकाळी सातच्या सुमारास कुटुंबीयांना बोलवण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना रुग्णाची परिस्थिती समजवण्यात आली. त्यानंतर त्यांना अवयवदानाची माहिती देण्यात आली. रुग्णाच्या पत्नीने मूत्रपिंड आणि यकृत दानाला संमती दर्शवली.
त्यानंतर रात्री साडेबारा वाजता सर्व परवानग्या आल्यावर अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक मूत्रपिंड एमजीएम रुग्णालयातील ५९ वर्षीय रुग्णास देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड फोर्टिस रुग्णालयातील ४६ वर्षीय रुग्णास देण्यात आले. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील ६४ वर्षीय रुग्णास देण्यात आले. २४ जानेवारीला सकाळी साडेसात वाजता सर्व शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. (प्रतिनिधी)