अक्कल दाढ आल्याने खरंच अक्कल वाढते का? संशोधकांनी दिलं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:05 PM2022-02-10T15:05:15+5:302022-02-10T15:11:12+5:30

खरंच अक्कल दाढ आल्यावर अक्कल येते का? तुम्हाला काय वाटतं? संशोधकांनी मात्र याचं उत्तर दिलं आहे. अन् ते उत्तर मजेशीर आहे.

does wisdom teeth increase your intelligence? know the funny answer from study | अक्कल दाढ आल्याने खरंच अक्कल वाढते का? संशोधकांनी दिलं मजेशीर उत्तर

अक्कल दाढ आल्याने खरंच अक्कल वाढते का? संशोधकांनी दिलं मजेशीर उत्तर

Next

दात म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाचा आरसा आहेत. सुंदर दातांमुळे तुमचे हास्य अधिक आकर्षक होते. दातांबाबत अनेक समज गैरसमज आहेत. काहीजण असं म्हणतात की अक्कल दाढ आली की अक्कल येते. असं बरेचदा एखाद्याची मस्करी करतानाही म्हटलं जातं. पण खरंच अक्कल दाढ आल्यावर अक्कल येते का? तुम्हाला काय वाटतं? संशोधकांनी मात्र याचं उत्तर दिलं आहे. अन् ते उत्तर मजेशीर आहे.

जेव्हा माणसाला अक्कलदाढ येते, तेव्हा त्या व्यक्तीची बुध्दिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता वाढते, असा सर्वसामान्य समज या दाढेविषयी दिसून येतो. अक्कलदाढ आल्यावर माणूस अधिक बुद्धिमान (Intelligent) होतो, असंही बोललं जातं. यावर संशोधकांनी संशोधन केलं असता, अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अक्कलदाढ आल्यावर माणसाच्या हुशारीत वाढ होत नसल्याचं या संशोधनांमधून समोर आलं आहे. असं असतानाही आपल्याकडे अक्कलदाढेविषयी असलेला समज कायम आहे.

अक्कलदाढ येणं म्हणजे हुशारी, विचार करण्याची क्षमता वाढणं हा, समज पूर्णतः चुकीचा आहे. ही हिरडीच्या सर्वात शेवटच्या म्हणजे तोंडाच्या आतल्या भागात येत असल्याने प्रौढ व्यक्तींना तिची विशेष काळजी घ्यावी लागते. अक्कलदाढ आलेल्या भागात थोडाशी जरी समस्या निर्माण झाली तरी तिचे रुपांतर तीव्र वेदनांमध्ये होते.

'वेबएमडी'च्या रिपोर्टनुसार, अक्कलदाढ ही तिच्यासोबत अनेक समस्याही घेऊन येते. दरवर्षी अमेरिकेत (America) अक्कलदाढ काढून टाकण्यासाठी सुमारे एक कोटी शस्त्रक्रिया होतात. अक्कलदाढेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. यात कॅव्हिटी, संसर्ग, दातांच्या आसपासचा भाग खराब होणं आणि हाडांमुळे आसपासच्या भागाचं नुकसान होणं आदी समस्यांचा समावेश आहे.

प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या तोंडात एकूण ३२ दात असतात. यात ४ (२ वरच्या बाजूस आणि २ खालच्या बाजूस) अक्कलदाढा येतात. चारही कोपऱ्यात अगदी शेवटी या दाढा येतात. या दाढा व्यक्तीला वयाच्या १७ ते २१ दरम्यान येत असल्याने त्यांचा संबंध समजूतदारपणा आणि बुध्दिमत्तेशी जोडला जातो. परंतु, अक्कलदाढेमुळे समजूतदारपणा, विचार करण्याची क्षमता किंवा बुध्दिमत्ता वाढत नसल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे, असं 'वेबएमडी'च्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

जर तुम्ही अक्कलदाढ काढून टाकली तर पहिल्या दिवशी रक्तस्त्राव (Bleeding) होण्याची शक्यता असते. तसंच काही काळ त्या भागात सूज जाणवते. अशा समस्या जाणवल्यास ब्रशने दात न घासण्याचा सल्ला दिला जातो. किमान २४ तास असं न करण्याचं सांगितलं जातं. पण या कालावधीत तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता, असं या अहवालात म्हटलं आहे.

Web Title: does wisdom teeth increase your intelligence? know the funny answer from study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.