बघावं ते नवलच! चक्क माणसांसारखा दोन पायांवर चालतो हा कुत्रा, कारण वाचून काळीज पिळवटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 01:13 PM2021-11-04T13:13:43+5:302021-11-04T13:13:55+5:30

सोशल मीडियावर सध्या डेक्स्टर (Dexter) कुत्र्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ते साहजिकच आहे. कारण एका अपघातात या कुत्र्यानं त्याचा एक पाय गमावला; पण तरीही हार न मानता माणसासारखा तो दोन पायांवर  चालतो. इच्छा तिथे मार्ग याचा नेमका अर्थ या डेक्स्टरकडे बघितल्यावर समजतो.

dog lost his leg in accident walking on two legs photo goes viral netizens appreciate | बघावं ते नवलच! चक्क माणसांसारखा दोन पायांवर चालतो हा कुत्रा, कारण वाचून काळीज पिळवटेल

बघावं ते नवलच! चक्क माणसांसारखा दोन पायांवर चालतो हा कुत्रा, कारण वाचून काळीज पिळवटेल

Next

अथक प्रयत्न करणारे कधीच अपयशी ठरत नाहीत असं म्हटलं जातं. आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी माणूस तर तयार असतोच; पण प्राणीही संकटांशी दोन हात करतात, याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या डेक्स्टर (Dexter) कुत्र्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ते साहजिकच आहे. कारण एका अपघातात या कुत्र्यानं त्याचा एक पाय गमावला; पण तरीही हार न मानता माणसासारखा तो दोन पायांवर  चालतो. इच्छा तिथे मार्ग याचा नेमका अर्थ या डेक्स्टरकडे बघितल्यावर समजतो.

दोन पायांवर चालणाऱ्या या डेक्स्टरनं (Three Legged Dog) सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. इच्छाशक्ती असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग निघतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा डेक्स्टर आहे. एका कार अपघातात डेक्स्टरचा पायच कापला गेला. आता डेक्स्टर कधीच चालू शकणार नाही, असं डेक्स्टरच्या मालकाला वाटलं; पण त्याला काही महिन्यांचं ट्रेनिंग दिलं आणि डेस्क्टर चक्क दोन पायांवर चालायला लागला. त्याचं सगळं वजन तो आता त्याच्या या दोन पायांवर सहज पेलतो आणि माणसासारखं चालतो.

सहा वर्षांचा डेक्स्टर सध्या सोशल मीडिया सेन्सेशन आहे. त्याच्या मालकानं, केन्टी पसेकनं @dexterdogouray या नावानं टिकटॉकवर त्याचं अकाउंटही उघडलं आहे. त्याचे 634.6 K फॉलोअर्स आहेत. त्याचे व्हिडिओ त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडतात. नुकताच त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. ‘कोणता कुत्रा कधी दोन पायांवर चालू शकतो? हो, असं होऊ शकतं’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये डेक्स्टर अगदी आरामात त्याच्या मागच्या दोन पायांवर अगदी माणसासारखा चालताना दिसतो. इतकंच नाही, तर पुढे येऊन तो हस्तांदोलनही करतो, असं व्हिडिओत दिसतं.

डेक्स्टरचा मालक केन्टी पसेक अमेरिकेत कोलोरॅडोमध्ये राहतो. अपघातानंतर डेक्स्टरची अवस्था बघून खूप वाईट वाटत असे. 45 मिनिटांच्या एका ड्राइव्हमध्ये झालेल्या अपघातात डेक्स्टरला त्याचा पाय गमवावा लागला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव तर वाचला; पण त्याला पाय गमवावा लागला. एका वर्षात त्याच्या पाच सर्जरी झाल्या. त्यामुळे तो खूप अशक्तही झाला होता; मात्र आता डेक्स्टर अगदी नेहमीसारखं आयुष्य जगतो. लोकांना त्याच्याकडे बघून आश्चर्यही वाटतं; पण महत्त्वाचं म्हणजे अनेकांना त्याच्यापासून संकटांशी लढण्याची आणि तरीही न हरण्याची प्रेरणाही मिळते.

Web Title: dog lost his leg in accident walking on two legs photo goes viral netizens appreciate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.