दिलदार पोलीस हवालदार, गेल्या २० वर्षांपासून मोकाट श्वानांवर करतोय आपल्याच लेकरांसारखं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:38 PM2021-05-27T14:38:42+5:302021-05-27T14:41:24+5:30

आज आम्ही तुम्हाला एका अशा अवलियाबाबत सांगणार आहोत जो मोकाट श्वानांचं गेल्या वीस वर्षापासून पोट भरत आहे. त्यांना जीवनदान देत आहे.

Dog loving police constable from Mumbai who feed them every day | दिलदार पोलीस हवालदार, गेल्या २० वर्षांपासून मोकाट श्वानांवर करतोय आपल्याच लेकरांसारखं प्रेम

दिलदार पोलीस हवालदार, गेल्या २० वर्षांपासून मोकाट श्वानांवर करतोय आपल्याच लेकरांसारखं प्रेम

Next

मुंबई - कोरोना काळात अनेकजण मुक्या प्राण्यांची सेवा करताना दिसत आहेत. अनेकजण खिशातून पैसे खर्च करून भटक्या श्वानांना जेवण देत आहेत. कुणी त्यांना शिबिरात नेत आहे तर कुणी त्यांना आपल्या घरी घेऊन जात आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा अवलियाबाबत सांगणार आहोत जो मोकाट श्वानांचं गेल्या वीस वर्षापासून पोट भरत आहे. त्यांना जीवनदान देत आहे. प्रमोद निकम असं या अवलियाचं नाव असून गेल्या २० वर्षापासून ते मुक्या श्वानांना खायला देत आहेत. 

कौतुकास्पद बाब म्हणजे प्रमोद हे न चुकता मोकाट श्वानांना रोज ताजं अन्न खाऊ घालतात. त्यांच्यावर उपचार करतात आणि आपल्या पोटच्या लेकरांसारखं त्यांच्यावर प्रेमही करतात. या मोकाट श्वानांसोबत त्यांचा एक लळा लागला आहे. प्रमोद निकम हे मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आपली ड्युटी बजावून ते मोकाट श्वानांना खायला देतात. 

मुंबई पोलिसात नोकरी करणं किती व्यस्ततेचं असतं हे काही सांगायला नको. तरी सुद्धा वेळ काढून प्रमोद मोकाट श्वानांची सेवा करतात. इतका लळा आणि नियमितता बहुदा बघायला मिळत नाही. प्रमोद निकम यांच्या परिवाराची खासियत म्हणजे केवळ तेच नाही तर त्यांची तिसरी पिढी मोकाट श्वानांची सेवा करतात. 

सध्या विक्रोळीतील ५० ते ६० श्वानांना आपल्या खिशातील पैशातून निकम दररोज रात्रीचे जेवण देतात. या माणूसकीच्या कामात त्यांना त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि सून हे सर्व मदत करतात. निकम कुटुंबीय केवळ श्वानांना किंवा मांजरींना जेवणच देत नाही तर त्यांना वैद्यकीय उपचारही मिळवून देतात.

श्वानांची सेवा करण्यात हे कुटुंब इतकं रमलंय की, हे श्वान उपाशी राहू नये म्हणून ते गेल्या २० वर्षात कुठे फिरायला सुद्धा गेले नाहीत. कधी काही झालंच तर प्रमोद निकम एकटे घरी थांबतात आणि इतर सदस्य बाहेरगावी जाऊन येतात. कुठेच जाता येत नसल्याची त्यांना कधीही खंत वाटली नाही. कारण त्यांचं श्वानांवर खूप प्रेम आहे. त्यांची सेवा करण्याचाच विचार त्यांच्या मनात सतत असतो. आपल्या लेकरांप्रमाणे त्यांना त्यांची काळजी असते.

प्रमोद निकम यांनी सांगितलं की, त्यांना बालपणापासूनच श्वान पाळण्याची आवड होती. मोकाट श्वानांचे हाल होताना बघून त्यांना नेहमीच वाईट वाटायचं. त्यातूनच त्यांनी आजूबाजूच्या मोकाट श्वानांना खायला देण्यास सुरूवात केली. हळूहळू हे प्रमाण वाढलं. त्यानंतर ते रोज मोकाट श्वानांसाठी जेवण तयार करून घेऊन जात होते. हे ते रात्री करायचे. त्यांना जेवायला देऊन ते रात्री उशीरा घरी परत यायचे. आता ठरलेली सात ते आठ ठिकाणे आहेत जिथे श्वान त्यांची वाट बघत असतात.

महत्वाची बाब म्हणजे कोरोना काळातही श्वानांचं पोट भरण्याचं हे काम थांबलेलं नाही. उलट अशावेळी त्यांना अन्नाची जास्त गरज असते हा विचार त्यांच्या मनात होता. त्यांनी एका मित्राला कोरोनाकाळात स्वयंसेवी संस्थेने भटक्या प्राण्यांसाठी जेवण तयार करण्याचे कंत्राट दिले होते. या मित्राने मला श्वानांचे जेवण पुरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना खूप मदत झाली. 

प्रमोद निकम यांचं नोकरीचं एक वर्ष शिल्लक आहे. त्यानंतरही त्यांचं हे श्वानांचं पोट भरण्याचं काम असंच सुरू राहणार आहे. नोकरीनंतर काय, कसं ही चिंता असूनही ते श्वानांची सेवा करत आहेत. करत राहणार असं दिसतंय. मुक्या श्वानांचं पोट भरणाऱ्या या अवलियाला मानाचा मुजरा.
 

Web Title: Dog loving police constable from Mumbai who feed them every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.