मैत्रिणीच्या विरहात 'त्याने' ३८ देश पायी पालथे घातले; तब्बल ४८,००० किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:54 AM2022-07-06T09:54:51+5:302022-07-06T09:55:06+5:30
या संपूर्ण प्रवासात सावानानं टॉमला एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे साथ दिली. एवढंच नाही, टॉमची काळजीही त्यानं घेतली आणि त्याला कायम प्रोत्साहन दिलं.
रोज तुम्ही किती चालता? - आता हा काय प्रश्न झाला? गाड्याघोड्या, सगळ्या सुखसुविधा हाताशी असताना कोण कशाला पाय दामटत फिरेल?.. तरीही आताशा अनेक जण फिरताना, चालताना दिसतात. कोणी आरोग्याच्या कारणामुळे, कोणी डॉक्टरांनी सांगितल्यामुळे, तर कोणी ‘मी चालतो’ हे दाखवण्यासाठी! पण एखाद्याला सांगितलं, बाबा रे, तू रोज एवढा चालतोस, तर पायी जगप्रदक्षिणा करशील का? अर्थातच असं विचारणाऱ्याला प्रत्येक जण वेड्यात काढेल हे नक्की, पण असा वेडेपणा अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील एका तरुणानं केला आहे. टॉम टर्किच असं त्याचं नाव. त्यानं पायी किती फिरावं? सात वर्षांत सहा खंडांतले तब्बल ३८ देश त्यानं पायी फिरून पालथे घातले आणि ४८ हजार किलोमीटरचा प्रवास केला. रोज तो साधारणपणे चाळीस ते पन्नास किलोमीटर चालायचा. ३८ देशांचा पायी प्रवास करून तो नुकताच आपल्या घरी परतला आहे. त्यामुळे त्याचा ठिकठिकाणी जंगी सत्कार होतो आहे. पण त्याच्याबरोबर त्याच्या आणखी एका जोडीदारालाही मोठा सन्मान मिळतो आहे. त्याचा हा जोडीदार आहे ‘सावाना’. अर्थातच एक कुत्रा.
या संपूर्ण प्रवासात सावानानं टॉमला एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे साथ दिली. एवढंच नाही, टॉमची काळजीही त्यानं घेतली आणि त्याला कायम प्रोत्साहन दिलं. टॉम म्हणतो, सावाना नसता, तर मी एवढा प्रवास करूच शकलो नसतो. या प्रवासात आम्हाला दोघांनाही अनेक हालअपेष्टांना, अडचणींना सामोरं जावं लागलं. या संकटांनी कधी कधी मी कोलमडून पडायचो, पण सावानाचा उत्साह मात्र पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता. सावाना जर एवढा चालू शकतो, तर आपण का नाही, या कारणानं थकलेलो असताना, अंगात त्राण नसतानाही मी चालायला सुरुवात करायचो.
पायी चालून एवढी मोठी जगप्रदक्षिणा करणारा टॉम हा जगातला आतापर्यंतचा दहावा व्यक्ती ठरला आहे. खरं तर त्याचा जागतिक विक्रमच व्हायचा, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याचं नाव नोंदलं जाणार होतं, पण काही तांत्रिक कारणांनी त्याचा हा विक्रम हुकला. अर्थात, टॉमला त्याचं काही सोयरसुतक नाही. कारण मुळात विक्रमासाठी पायी जगप्रवासाला तो निघालेलाच नव्हता. टॉमचा हा जागतिक विक्रम हुकला असला, तरी या संपूर्ण प्रवासात त्याला साथ देणारा त्याचा जानी दोस्त, सावानानं मात्र जागतिक विक्रमाला गवसणी घातलीच. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याचं नाव नोंदलं गेलं आहे. कारण एखाद्या प्राण्यानं पायी इतका मोठा प्रवास करण्याची ही पहिलीच घटना आहे.
खरं तर टॉमला पाच वर्षांतच हा प्रवास पूर्ण करायचा होता, पण मध्यंतरी तो गंभीर आजारी पडला, कोरोनाकाळातही त्याच्या प्रवासाला ब्रेक लागला, त्यामुळे अपेक्षित वेळेत तो आपला प्रवास पूर्ण करू शकला नाही. २ एप्रिल २०१५ रोजी, आपल्या २६व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यानं या प्रवासाला सुरुवात केली. शूज, स्लीपिंग बॅग, लॅपटॉप, एक डीएसएलआर कॅमेरा आणि खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी प्लास्टिकचा एक क्रेट एवढंच सामान त्यानं स्वत:बरोबर ठेवलं होतं. टॉम पहिल्यांदा न्यू जर्सीहून पनामाला गेला. त्यानंतर टेक्सास येथून एका ॲनिमल शेल्टरमधून त्यानं सावानाला सोबत घेतलं. तिथून बोगोटा, कोलंबिया, माँटेव्हीडिओ, उरुग्वे, अंटार्क्टिका, युरोप, आयर्लंड, स्कॉटलंड असा प्रवास त्यांनी केला. इथे टॉम गंभीर आजारी पडला. काही काळ त्याला प्रवास थांबवावा लागला आणि नंतर प्रवास अर्धवट सोडून घरी परतण्याचा निर्णयही घ्यावा लागला. त्यानंतर टॉम आणि सावाना; दोघंही इटली, स्लोवेनिया, क्रोएशिया, अल्बानिया, ग्रीस, टर्की, जॉर्जिया असा प्रवास करत नुकतेच पुन्हा न्यू जर्सीला पोहोचले.
आपल्या या पायी जगप्रवासाची तयारी टॉमनं १५ वर्षांपूर्वीच सुरू केली होती. कॉलेजमध्ये असतानाच उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करून दोन वर्षांच्या प्रवासाला पुरेल एवढा पैसाही त्यानं साठवून ठेवला होता. काही पैसा त्यानं क्राऊडफंडिंगमधून जमा केला आणि तो जगप्रवासाला निघाला.
मैत्रिणीच्या मृत्यूमुळे आत्मशोध!
टॉमच्या या जगप्रवासाची प्रेरणा होती त्याची मैत्रीण ॲन मेरी. जेट स्कीच्या ॲक्सिडेंटमध्ये वयाच्या १७व्या वर्षीच तिचा मृत्यू झाला. टॉम म्हणतो, आयुष्य किती क्षणभंगूर आहे, याची पहिल्यांदाच मला प्रखर जाणीव झाली. आपणही एक दिवस असंच नष्ट होणार आहोत हे माझ्या लक्षात आलं आणि आत्मशोधात मी घराबाहेर पडलो.