डोंबिवलीत महिला रिक्षाचालक
By admin | Published: March 14, 2016 01:43 AM2016-03-14T01:43:04+5:302016-03-14T09:20:25+5:30
लहानपणापासून रिक्षाची आवड असल्यामुळे आयुष्यात एक दिवस तरी ती चालवण्याचे डोंबिवलीतील रजिता जाधव यांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे
डोंबिवली : लहानपणापासून रिक्षाची आवड असल्यामुळे आयुष्यात एक दिवस तरी ती चालवण्याचे डोंबिवलीतील रजिता जाधव यांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. जाधव यांना इरादापत्र (परवाना) मिळाल्याने सोमवारपासून त्या रिक्षा व्यवसाय सुरू करत आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील महिलांचा रिक्षा प्रवास आता सुरक्षित होणार आहे.
डोंबिवलीत शहरांतर्गत प्रवासासाठी रिक्षा हे एक प्रमुख साधन आहे. ४० वर्षे या शहरात एकही महिला रिक्षाचालक नव्हती. त्यामुळे शहरातील पहिली महिला रिक्षाचालक होण्याचा मान रजिताला मिळाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी तिला इरादापत्र (परवाना) दिले. त्यामुळे तीही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत या व्यवसायात उतरत आहे.
आधी विक्रोळी येथे राहणाऱ्या रजिता १२ वर्षांपूर्वी डोंबिवलीत वास्तव्यास आल्या. त्या महाराष्ट्रनगरमध्ये राहतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांचे दहावीपर्यंतच शिक्षण झाले. रिक्षा आवडत असल्याने ती एक दिवस तरी चालवण्याची त्यांची इच्छा होती. शेजारी राहत असलेले रिक्षाचालक राजीव जोशी यांनी त्यांना रिक्षा व नियमांची माहिती दिली. मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये पुढे त्यांनी शेखर व मनोज जोशी यांच्याकडून रिक्षा चालवण्याचे धडे घेतले. रिक्षा परवान्यासाठी त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आॅनलाइनद्वारे अर्ज केला. त्यात त्यांना संधी मिळाली. रिक्षाचालक-मालक युनियनचे शेखर जोशी यांचे मार्गदर्शन मिळाल्याने माझे रिक्षाचालक होण्याचे स्वप्न साकार होत आहे, असे त्यांनी सांगितले. वर्षभरापासून त्या रिक्षा चालवण्याचे धडे घेत आहेत, असे जोशी म्हणाले. (प्रतिनिधी)