इंटरव्युमध्ये महिलेला चुकीचा प्रश्न विचारल्याने कंपनीला द्यावी लागली ३ लाखांची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:03 PM2022-08-22T19:03:19+5:302022-08-22T19:05:01+5:30
जगातल्या सर्वांत मोठ्या पिझ्झा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महिला उमेदवाराला (Women Candidate) तिचं वय (Age) विचारलं. अधिकाऱ्यांना त्यांची ही चूक खूप महागात पडली. कंपनीला संबंधित महिला उमेदवाराची माफी तर मागावी लागलीच; पण तिला नुकसानभरपाईदेखील द्यावी लागली.
सध्याच्या काळात मनासारखी नोकरी (Job) मिळणं काहीसं अवघड आहे. अर्थात त्यामागे कारणंही अनेक आहेत. नोकरी मिळावी यासाठी बहुतांश जण इंटरव्ह्यूला जाताना वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण तयारी करतात. काही वेळा इंटरव्ह्यूच्या वेळी विचित्र किस्से घडल्याचंही आपण ऐकतो, वाचतो. सध्या असाच एक प्रकार खूप चर्चेत आहे. आपल्याकडे महिलेचं वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारू नये, असं सांगितलं जातं; पण जगातल्या सर्वांत मोठ्या पिझ्झा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, महिला उमेदवाराला (Women Candidate) तिचं वय (Age) विचारलं. अधिकाऱ्यांना त्यांची ही चूक खूप महागात पडली. कंपनीला संबंधित महिला उमेदवाराची माफी तर मागावी लागलीच; पण तिला नुकसानभरपाईदेखील द्यावी लागली.
डॉमिनोज या जगातल्या सर्वांत मोठ्या पिझ्झा कंपनीला नुकतीच एका महिलेची माफी मागून तिला नुकसानभरपाई द्यावी लागली. डॉमिनोज पिझ्झाने (Dominos Pizza) उत्तर आयर्लंडमधल्या (Northern Ireland) एका शाखेमध्ये डिलिव्हरी पार्टनर पदासाठी (Delivery partner post) भरती प्रक्रिया घोषित केली. 'बीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेनिस वॉल्श नावाच्या एका महिलेनं या पदासाठी अर्ज केला. कंपनीने जेनिस यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यूमध्ये पॅनेलनं त्यांना त्यांचं वय विचारलं आणि रिजेक्ट केलं. या प्रकारामुळे जेनिस संतापल्या आणि त्यांनी लिंग, तसंच वयाच्या आधारे भेदभाव केला म्हणून डॉमिनोज पिझ्झा कंपनीविरोधात खटला दाखल केला.
'डॉमिनोज पिझ्झा या कंपनीने मला वय आणि लिंगाचं (Sex) कारण पुढे करून डिलिव्हरी पार्टनर म्हणून नोकरी दिली नाही. इंटरव्ह्यू पॅनेलने (Interview Panel) मला माझ्या वयाबद्दल विचारलं असता मी उत्तर दिलं; मात्र पॅनेलने कागदावर काही तरी लिहून त्यावर शेरा (Remark) मारला. पॅनेलच्या सदस्यांनी कोणती निरीक्षणं नोंदवली आहेत, हे पाहण्याचा मी प्रयत्न केला असता, ही निरीक्षणं उमेदवाराला दाखवता येणार नाहीत, असं सांगून मला सदस्यांनी निरीक्षणं दाखवण्यास नकार दिला,' असा दावा जेनिस यांनी केला आहे.
या प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झा कंपनीच्या इंटरव्ह्यू पॅनेलमधल्या एका सदस्यानं वॉल्श यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची माफी मागितली. पॅनेलच्या सदस्यानं चूक मान्य करून वॉल्श यांना सांगितलं की, ''इंटरव्ह्यूमध्ये कोणाचंही वय विचारणं चुकीचं आहे; मात्र आम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती.''
दरम्यान, वॉल्श इंटरव्ह्यू देऊन घरी परतल्या आणि कंपनीकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे त्यांचं लक्ष लागलं होतं; मात्र इंटरव्ह्यू होऊनदेखील कंपनीने डिलिव्हरी पार्टनर्सच्या पदासाठी पुन्हा जाहिरात दिली, तेव्हा आपली निवड झाली नसल्याचं वॉल्श यांच्या लक्षात आलं. त्यानंतर निवड झाली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. हे समजल्यावर आपल्याला वय आणि लिंग या गोष्टींमुळे नकार तर दिला गेला नाही ना, असा प्रश्न वॉल्श यांच्या मनात निर्माण झाला. वॉल्श म्हणाल्या, की 'मी केवळ पुरुषांनाच डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे महिला असल्याने मला ड्रायव्हरची नोकरी मिळाली नाही,' असं मला वाटतं.
वॉल्श यांनी या प्रकाराबाबत डॉमिनोज पिझ्झा कंपनीच्या संबंधित शाखेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून संवाद साधला. त्या वेळी एका कर्मचाऱ्याने सांगितलं, की 'या कामासाठी 18 ते 30 वयोगटातल्या व्यक्तींनाच उपयुक्त मानलं जातं.' सर्व माहिती घेतल्यानंतर वॉल्श यांनी डॉमिनोज पिझ्झा कंपनीविरोधात लिंग आणि वयाच्या अनुषंगाने नोकरी देताना भेदभाव केल्याप्रकरणी खटला दाखल केला. डॉमिनोज पिझ्झाची शाखा आणि तिचे मालक जस्टिन क्वर्क यांना या खटल्यात प्रतिवादी करण्यात आलं.
उत्तर आयर्लंडच्या समानता आयोगासमोर (Equality Commission) वॉल्श यांच्या खटल्याच्या सुनावणी झाली. वॉल्श यांनी डॉमिनोज पिझ्झा कंपनीवर लावलेले आरोप योग्य असल्याचं आयोगाच्या निर्दशनास आलं. त्यानंतर डॉमिनोज पिझ्झाच्या संबंधित शाखेच्या मालकानं वॉल्श यांची माफी मागितली आणि 4250 पौंड म्हणजेच सुमारे 3.70 लाख रुपये नुकसानभरपाई दिली. उत्तर आयर्लंडमध्ये सध्या या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.