अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:29 PM2019-08-16T13:29:34+5:302019-08-16T13:35:23+5:30
ग्राहकांना सतर्क करणाऱ्या पोलिसांच्या ट्विटची जोरदार चर्चा
शिलाँग: देशाच्या सर्वच राज्यांमधील पोलीस विभाग सोशल मीडियावर सक्रीय होत आहेत. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन होत असलेली ट्विट्स अनेकदा लक्षवेधीही ठरत आहेत. मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस यात आघाडीवर असताना आता छोट्या राज्यांच्या पोलीस दलांच्या ट्विट्सचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनी केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. कोणाचा ५९० किलो गांजा हरवला आहे का, असा प्रश्न पोलिसांनी ट्विटरवर विचारला होता. यानंतर आता मेघालय पोलिसांच्या ट्विटचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. 'घोटाळ्याबद्दल अलर्ट! शिलाँगच्या बाजारात अमली पदार्थांचा तुटवडा आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारे त्यांच्या ग्राहकांना रसनाची पावडर देत आहेत,' असं मेघालय पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
SCAM ALERT!
— Meghalaya Police (@MeghalayaPolice) August 15, 2019
*clears throat*
Shillong market is so dry that peddlers are fooling their clients with Rasna(!?) Powder. 😆😆
If you just got 'Rasna Ripped' off by your drug peddler, you know where to report.
Kudos to ANTF team!
Cc: @Rasna_Housepic.twitter.com/7XVZhLaOt8
'जर तुम्हाला अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीनं रसना दिला असेल, तर त्याची तक्रार कुठे करायची हे तुम्हाला माहिती आहेच. एएनटीएफ टीमचं कौतुक. सीसी: रसना हाऊस,' असंदेखील पोलिसांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटसोबत पोलिसांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये कागदाचे तीन लहान चौकनी तुकडे दिसत असून त्यावर रसना पावडर आहे. सध्या शिलाँगमध्ये अमली पदार्थांचा तुटवडा आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारे अनेकजण त्यांच्या ग्राहकांना रसना पावडर देत आहेत.