कारमध्ये ब्युटी प्रॉडक्ट ठेवणं पडलं महागात, स्फोट झाल्यावर कारचा चेहरा-मोहराच बदलला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:53 AM2019-09-25T11:53:02+5:302019-09-25T12:01:57+5:30
इथे १९ वर्षीय तरूणीने सेकंड हॅन्ड होंडा सिविक खरेदी केली होती. ज्यात ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स ठेवत होती.
अमेरिकेतील राज्य मिसूरीत कारमध्येस्फोट होण्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे १९ वर्षीय तरूणीने सेकंड हॅन्ड होंडा सिविक खरेदी केली होती. ज्यात ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स ठेवत होती. पण तिची ही हौस तिला इतकी महागात पडली की, कारचा चेहरा-मोहराच बदलून गेला. ही मुलगी जे ब्युटी प्रॉडक्ट्स कारमध्ये ठेवत होती, त्यात एक ड्राय शॅम्पूची कॅनही होती. ज्यामुळे कारमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, कारच्या छताला मोठं छिद्र पडलं.
(Image Credit : washingtonpost.com)
तज्ज्ञांचं मत आहे की, ड्राय शॅम्पूच्या कॅनमध्ये प्रोपेन आणि ब्यूटेन सारखे ज्वलनशील पदार्थ होते. जे सामान्यपणे आग पेटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लायटरमध्येही असतात. शॅम्पूच्या कॅनवरही यात ज्वलनशील पदार्थ असण्याची सूचना लिहिली होती. आणि त्यावर लिहिलं होतं की, जास्त तापमानाच्या संपर्कात आल्यावर कॅन फुटू शकते. ते म्हणाले की, कारमध्ये तापमान अधिक झालं असावं, ज्यामुळे ड्राय शॅम्पूची कॅन फुटली आणि कारचं नुकसान झालं.
या घटनेनंतर मुलीच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीला तीन वर्षांआधीच ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं होतं आणि कार ती स्वत: चालवते. तिला नेहमीच कुठे ना कुठे जावं लागत असल्याने ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स कारमध्येच ठेवत होती. त्या ड्राय शॅम्पूचाही समावेश होता.
या स्फोटानंतर कारचं किती नुकसान झालं याची चौकशी केली जात आहे. पण विमा कंपनीने १५ हजार डॉलरपेक्षा अधिक नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. हा स्फोट झाला तेव्हा मुलगी सुदैवाने कारमध्ये नव्हती. नाही तर मोठा अनर्थ झाला असता.