पगार कमी असल्यानं कर्मचाऱ्याने लढवली अनोखी शक्कल; कंपनीनं डोक्यावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:13 PM2022-03-16T12:13:01+5:302022-03-16T12:23:23+5:30
कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकारानं कंपनी वैतागली, HR ने दिले तात्काळ आदेश
कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहींना पगारकपातीचा मार सहन करावा लागला. सॅलरी कमी असल्याने घरखर्च भागवणं कठीण होऊ लागलं. महागाईच्या काळात सॅलरी कमी असल्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसतो. त्यात कमी सॅलरीचा विरोध करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने केलेला अनोखा विरोध सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या कर्मचाऱ्याने थेट घरगुती सामानासह ऑफिसमध्ये शिफ्ट झाला आहे.
या कर्मचाऱ्याचे म्हणणं आहे की, मला कंपनीकडून मिळणारी सॅलरी इतकी कमी आहे ज्यातून मला घराचे भाडेही देणे शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे मी ऑफिसमध्ये सामान शिफ्ट केले. तो डेस्कच्या खाली स्लिपिंग बॅगमध्ये झोपू लागला. ही घटना अमेरिकेतील आहे. सिमोन नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ टीकटॉकवर अपलोड केला आहे. सिमोननं अत्यावश्यक वस्तू घेऊन ऑफिसमध्ये राहण्यास सुरूवात केली आहे.
“कंपनीकडून इतकी सॅलरी मिळत नाही जेणेकरून...”
या कर्मचाऱ्याने सांगितले की, घरातून त्याच्या सामानासह तो ऑफिसमध्ये राहायला आला आहे. कारण कंपनीकडून त्याला इतका पगार मिळत नाही. ज्यातून घराचे भाडे देऊ शकेल. सिमोननुसार त्याचे बहुतांश सहकारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे ऑफिस खाली असल्याने राहण्यासाठी त्याला पर्यायी जागा उपलब्ध झाली आहे. सिमोननं ऑफिसच्या कॅबिनमध्ये कपडे, बॅग्स आणि इतर वस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे ऑफिसचं घरात रुपांतर झाल्यासारखं वाटतं. आंघोळीसाठी तो ऑफिसच्या बाथरूमचा वापर करतो. ऑफिसच्या फ्रिजमध्येच खाण्या-पिण्याचं सामान ठेवतो.
सिमोननं ऑफिसचं घर केलेले पाहून कंपनीने त्याला ३-४ दिवसानंतर असा प्रकार करू नको असं बजावलं आहे. त्यासोबत HR ने सोशल मीडियावरून ऑफिसमध्ये राहत असलेले व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. टिकटॉकवर कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला त्याला आतापर्यंत १२ मिलियन लोकांनी पाहिलं आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अशाप्रकारचे हटके व्हिडीओ रातोरात व्हायरल होतात. त्यात पहिल्यांदाच सॅलरी कमी असल्याच्या कारणाने कुणी कर्मचारी थेट ऑफिसमध्ये घर बनवून राहत असल्याचं अनोखा प्रकार लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे या व्हिडीओची चर्चा अनेकांमध्ये आहे.