लिपस्टिक वापरण्याचे दुष्परिणाम
By admin | Published: February 21, 2017 01:17 PM2017-02-21T13:17:15+5:302017-02-21T13:32:20+5:30
महिलांच्या सौंर्दयात लिपस्टिक भर घालते यात काही शंका नाही, मात्र याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, असे वाटत असेल तर दुष्परिणाम नक्की जाणून घ्या.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - महिलांच्या मेक-अप किटमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकशिवाय कोणतेही मेक-अप किट पूर्ण होऊ शकत नाही. निरनिराळे रंग आणि ब्रँड्सच्या लिपस्टिकमुळे मेक-अप किट पूर्ण झाल्यासारखं महिलांना वाटतच नाही.
महिलांच्या सौंदर्यात लिपस्टिक भर घालते यात काही शंका नाही, मात्र याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, असे वाटत असेल तर दुष्परिणाम नक्की जाणून घ्या.
लिपस्टिकचे दुष्परिणाम पाहिल्यानंतर प्रत्येक 'ती'ला हवीहवीशी वाटणारी लिपस्टिक नकोशी होईल. घरातून बाहेर पडताना ब-याच प्रमाणात महिलावर्ग लिपस्टिकचा वापर करतात, ती लिपस्टिक पूर्ण दिवस किंवा कधी-कधी रात्री झोपतानाही तशी ओठांवर कायम असते.
काही लिपस्टिकमध्ये शिसांचे प्रमाण असते, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आणि नुकसान पोहोचवणारे असते. यामुळे एलर्जी, चुरचुरणे आणि ओठ आणि त्या शेजारी त्वचेवर चिरा पडणे, यांसारखी लक्षणे समोर येतात. यातील घातक रसायने आणि जड धातूंमुळे कॅन्सरदेखील होण्याची शक्यता आहे.
एक नजर टाकूया लिपस्टिकच्या दुष्परिणामांवर
1. जड धातूंमुळे मूत्रपिंडाला धोका
लिपस्टिकमध्ये कॅडमियम, मॅग्नेशियम आणि क्रोमियम यांसारखे घातक धातू असतात. या धातूंमुळे आरोग्याशी संबंधित धोकादायक रोग आणि शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. कॅडमियमच्या अति प्रमाणामुळे मूत्रपिंडासंबंधित आजार होण्याचा धोका असतो. तसंच लिपस्टिकच्या वारंवार वापरामुळे पोटाचा ट्युमरदेखील होऊ शकतो, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
2. शिसांमुळे मज्जासंस्थेवर परिणाम
शिसे हे लिपस्टिकमध्ये वापरण्यात येणारे सर्वसामान्य घटक. यामध्ये न्यूरोटॉक्सिन हा विषारी घटक असून तो मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करतो. शिवाय, मेंदू, हार्मोन आणि प्रजनन प्रक्रियेवरही याचा परिणाम होऊ शकतो.
3.घातक पेट्रोकेमिकल
लिपस्टिकमधील पेट्रोकेमिकलमुळे शारीरिक-बौद्धिक विकासासहीत प्रजननावर दुष्परिणाम होतो.
4. कॅन्सर होण्याची शक्यता
लिपस्टिक जास्त काळापर्यंत टिकून राहावी यासाठी त्यात वापरली जाणा-या जंतुनाशकांमध्ये कॅन्सर या रोगाला आमंत्रण देणारे घटक असतात. शिवाय, यात असलेल्या खनिज तेलामुळे स्किन पोर्स ब्लॉक होतात यामुळे शरीरावर कायमस्वरुपी हानिकारक परिणाम होण्याची शक्यता आहे.
5. रसायनं शरीरासाठी घातक
बिस्मथ ऑक्झिक्लोराईड (bismuth oxychloride) हे रसायन लिपस्टिक टिकून राहावी यासाठी वापरले जाते, जे शरीरासाठी अंत्यत घातक आहे.
6. पोटात जातंय विष
अनेकदा ओठांवरुन जीभ फिरवताना किंवा जेवताना ब-याच लिपस्टिकही खाल्ली जाते. त्यामुळे कित्येक त्यातील विषारी पदार्थ पोटात जातात. अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम व मॅगनीज सारखी विषारी रसायनं पोटात गेल्यानं मोठ्या प्रमाणात आरोग्याला धोका होऊ शकतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
त्यामुळे यापुढे लिपस्टिक खरेदी करताना त्यात घातक, हानिकारक रसायनं नाहीत, याबाबत पडताळणी करुन घ्यायला विसरू नका.