आता तुम्हाला दाखवतोच! न्याय न मिळाल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कापलं; पोलीस स्टेशन अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:27 AM2021-06-21T10:27:29+5:302021-06-21T10:27:45+5:30
वीज कर्मचारी आणि रिक्षा चालकातील वाद; पोलिसांनी दखल न घेतल्यानं वीज पुरवठा खंडित
जालंधर: पंजाबच्या जालंधरमध्ये वीज विभागात काम करणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याच्या दुचाकीला एका रिक्षानं धडक दिली. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्याकडे असणारी रोख रक्कम लुटण्याचादेखील प्रयत्न झाला. या प्रकरणी रिक्षा चालकाच्या अटकेसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांची हेड कॉन्स्टेबल बलवंत सिंग यांच्याशी धक्काबुक्की झाली. पोलिसांकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यासह आसपासच्या विभागाचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे परिसरात एकच गोंघळ उडाला.
वीज विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणारे बलदेव कुमार शनिवारी रात्री कार्यालयातून घरी जात होते. त्यावेळी उलट दिशेनं येणाऱ्या रिक्षानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यांचा रिक्षा चालकाशी वाद झाला. रिक्षा चालकानं त्याच्या मित्रांना बोलावून कुमार यांना मारहाण केली. रिक्षा चालक आणि त्याच्या मित्रांनी रिक्षा दुरुस्त करण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यानं ते आपल्याला जबरदस्तीनं एटीएममध्ये घेऊन गेले, असा आरोप कुमार यांनी केला.
रिक्षा चालकाविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी वीज कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हेड कॉन्स्टेबल आणि कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्कीदेखील झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यासह परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. पोलिसांनी आम्हाला न्याय न दिल्यानं आम्ही तिथे आंदोलन करत होतो, अशी माहिती कनिष्ठ अभियंता मदन लाल यांनी दिली.
पोलीस दाद देत नसल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी दोन तास वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे पोलीस ठाण्यासह आसपासच्या परिसराला फटका बसला. याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त सुखजिंदर सिंग यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी रिक्षा चालक आणि बलदेव कुमार यांच्यातला वाद मिटवला. त्यानंतर परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला.