Video: ग्रेट भेट! 30 वर्षांनंतरही हत्तिणीनं काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बरोब्बर ओळखलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:10 PM2019-05-02T14:10:26+5:302019-05-02T14:13:00+5:30
हत्तीण आणि कर्मचाऱ्याच्या भेटीनं उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
बर्लिन: माणसं माणसांना विसरतात. काळजी घेणारी माणसं विस्मरणात जातात, असं म्हटलं जातं. मात्र प्राणी कधीच कोणाला विसरत नाही. आपलं कोण, परकं कोण ते त्यांच्या अगदी नीट लक्षात राहतं. याच गोष्टीची प्रचिती देणारी एक घटना जर्मनीत घडली. प्राणी संग्रहालयाचा कर्मचारी आणि हत्तिणीची तब्बल तीन दशकांनंतर भेट झाली. विशेष म्हणजे तीन दशकांनंतरही हत्तिणीनं क्षणार्धात कर्मचाऱ्याला ओळखलं. ही ग्रेट भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेला विषय ठरली आहे.
स्कॉटलंडमधल्या ग्लास्गोतल्या प्राणीसंग्रहालयात 1970, 1980 च्या दशकात काम केलेल्या पीटर अॅडमसन यांनी किर्स्टी नावाच्या हत्तिणीची नुकतीच भेट घेतली. अॅडमसन कॅल्डरपार्क प्राणीसंग्रहालयात काम करायचे. त्यावेळी किर्स्टीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पुढे 1987 मध्ये किर्स्टीला इंग्लंडच्या वायव्येला असलेल्या चेस्टरमध्ये हलवण्यात आलं. तिथे तिची भेट ज्युडी नावाच्या हत्तिणीशी झाली. त्यानंतर या दोघींना डब्लिनला स्थलांतरित करण्यात आलं. 1994 ते 2005 या कालावधीत किर्स्टी ज्युडीसह डब्लिनलमध्ये राहत होती. यानंतर त्या दोघींना जर्मनीच्या सारलँडमध्ये हलवण्यात आलं.
किर्स्टीनं स्कॉटलंड सोडल्यावर अॅडमसन यांचा तिच्याशी असलेला संपर्क तुटला. मात्र काही वर्षांनंतर अॅडमसन यांनी किर्स्टीचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्राणीसंग्रहालयांमध्ये मिळालेल्या माहितीनंतर ती जर्मनीत असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी जर्मनीला जाऊन किर्स्टीची भेट घेतली. किर्स्टी बराच काळ अॅडमसन यांना बिलगून होती. हत्ती कधीही कोणतीही गोष्ट विसरत नाही याची प्रचिती आल्याची भावना या भेटीनंतर अॅडमसन यांनी व्यक्त केली. 'किर्स्टीनं मला जवळ येऊ दिलं. तो क्षण मला भावुक करून गेला. ही भेट कायम माझ्या स्मरणात राहील,' अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.