इमर्जन्सीमध्ये आमदाराने शस्त्रक्रिया करुन वाचवले महिलेचे प्राण
By admin | Published: February 24, 2017 01:55 PM2017-02-24T13:55:02+5:302017-02-24T14:45:34+5:30
आमदार राजकीय कर्तव्याला पहिले प्राधान्य देतात. पण मिझोराममधल्या एका आमदाराने वेळेची गरज ओळखून डॉक्टरकीच्या जबाबदारीला पहिले प्राधान्य दिले.
Next
ऑनलाइन लोकमत
गुवहाटी, दि. 24 - आमदार राजकीय कर्तव्याला पहिले प्राधान्य देतात. पण मिझोराममधल्या एका आमदाराने वेळेची गरज ओळखून डॉक्टरकीच्या जबाबदारीला पहिले प्राधान्य दिले. त्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. मिझोरामचे आमदार के. बैचुहा आमदार असण्याबरोबरच डॉक्टरही आहेत.
डॉ. बैचुहा यांना त्यांच्या मतदारसंघातील एक महिला पोटातील वेदनेने विव्हळत असल्याचे समजले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बाहेर गेल्याने तिच्यावर उपचार कोण करणार असा प्रश्न होता. जेव्हा आमदार बैचुहा यांनी त्या महिलेला तपासले. तेव्हा त्यांना महिलेला तात्काळ शस्त्रक्रियेची गरज असल्याचे लक्षात आले.
शस्त्रक्रिया झाली नसती तर, त्या महिलेचा मृत्यू अटळ होता. डॉ. बैचुहा यांनी जास्त वेळ न दवडता आपले इतर राजकीय कार्यक्रम बाजूला ठेवले व त्या महिलेवर शस्त्रक्रिया केली. आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉ. बैचुहा यांनी इम्फाळच्या रिजनल मेडीकल कॉलेजमधून पदवी मिळवली आहे.
1991 मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर जवळपास 20 वर्ष त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस केली. 2013 मध्ये राजकारणात प्रवेश करुन ते आमदार झाले. शेकडो शस्त्रक्रिया करणा-या डॉ. बैचुहा यांनी आमदार बनण्यापूर्वी 2013 मध्ये शेवटची शस्त्रक्रिया केली होती.