हात नसलेल्या एमिलीचं अफाट ‘हस्त’कौशल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 08:53 AM2024-07-22T08:53:00+5:302024-07-22T08:53:14+5:30

शेफची सुरी ती पायांच्या दोन्ही अंगठ्यात धरते, भाजी कोणतीही असो ती पायाने बारीक चिरते. रुचकर स्वयंपाक बनवते. तिखटापासून गोडापर्यंत एकाहून एक सरस शाकाहारी पदार्थ बनवते

Emily, who has no hands, has immense 'hand' skills | हात नसलेल्या एमिलीचं अफाट ‘हस्त’कौशल्य

हात नसलेल्या एमिलीचं अफाट ‘हस्त’कौशल्य

शेफची सुरी ती पायांच्या दोन्ही अंगठ्यात धरते, भाजी कोणतीही असो ती पायाने बारीक चिरते. रुचकर स्वयंपाक बनवते. तिखटापासून गोडापर्यंत एकाहून एक सरस शाकाहारी पदार्थ बनवते. तिचे स्वयंपाकाचे व्हिडीओ बघणारे तिचं कौशल्य बघून अवाक् होतात. २२ वर्षाची ‘ती’ हात नसताना स्वतंत्र, स्वावलंबी  जीवन कसं जगायचं याच जिवंत उदाहरण आहे. हात नसतानाही तिचं ‘हस्त‘कौशल्य अफाट आहे. 

ती म्हणजे एमिली राॅऊले. ती आधी कॅलिफोर्नियातील ओशनसाइड या शहरात राहायची. २०२१ मध्ये आपल्या आई-बाबांसोबत ती अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यात राहायला आली.  एमिली जन्माला आली तीच दोन हाताविना. मायक्रोगॅस्ट्रिया हा दुर्मिळ आजार तिला होता. या परिस्थितीसह मोठं होताना एमिली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यास समर्थ होत गेली. दोन हात नसलेली एखादी व्यक्ती एवढी स्वावलंबी जीवनशैली कशी जगू शकते, हा प्रश्न एमिलीला पाहून प्रत्येकालाच पडतो. तिचा हसतमुख चेहरा आणि तिच्यातला उत्साह प्रत्येकाचे मन जिंकून घेतो.  प्रत्येक गोष्ट करून पाहण्याची इच्छा या सवयीमुळे एमिलीने अवघड गोष्टीही स्वत:साठी सहज करून घेतल्या. एखादी गोष्ट अवघड आहे म्हणून तिच्याकडे एमिली कधीही पाठ फिरवत नाही. चुकांमधून शिकत त्यात पारंगत होत जाणं हा तिचा स्वभाव. मग ते स्वयंपाक असो, चारचाकी गाडी चालवणं असो की अजून काही. लहानपणापासून तिच्या आजूबाजूचे लोक हात वापरून जे जे करतात ते सर्व पक्क्या निर्धाराने  एमिलीही करून दाखवते. लहानपणापासून ते आजपर्यंत हेच सुरू आहे. आणि म्हणूनच ती आज अपंग, आजारी, दुर्बल किंवा सगळं काही नीट असूनही प्रयत्न न करणाऱ्या, रडत बसणाऱ्या लोकांसाठी एक आदर्श बनली आहे. सर्वसामान्य माणूस जी गोष्ट करताना हात वापरतात ती करताना ती आपले पाय वापरते.

एमिली पायाने स्वत:चं आवरते, दागिने घालते, मेकअप करते, मेल चेक करते, लिहिते आणि अगदी चारचाकी वाहनदेखील चालवते. गाडी चालवण्याचं तिने प्रशिक्षण घेतलं असून तिला त्याचं लायसेन्सही  मिळालं आहे. तिच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. सगळ्या गोष्टी ती लोकांच बघून, सूक्ष्मपणे निरीक्षण करून मग करून पाहते. अमुक गोष्ट करताना कोणती पायरी सोपी, कोणती अवघड हे बघून ती सोप्यापासून सुरुवात करते. आता तर जे इतरांना अवघड वाटतं ते एमिलीसाठी सोपं सहज असतं. इतर कोणत्याही कामापेक्षा एमिली स्वयंपाक करण्यात खूप रमते. 

आधी तिला स्वयंपाकाची आवड नव्हती. आवड नव्हती म्हणण्यापेक्षा तिला स्वयंपाक जरा अवघड वाटायचा. पण स्वावलंबी व्हायचं असेल तर स्वयंपाक यायलाच हवा म्हणत तिने स्वयंपाकाच्या छोट्या छोट्या गोष्टी करून पाहायला सुरुवात केली. ती शाळेत असल्यापासूनच शाकाहारी. त्यामुळे शाकाहारी पदार्थ करण्यात तिला रस होता. पास्ताचे अनेक प्रकार ती आता सहज करते. त्यात रेडी टू ईट हा पर्याय न वापरता पास्तासाठी लागणारे साॅसेसही स्वत; करून पास्ता डीश तयार करते. तिच्या मते क्रीम ब्रूली हा सर्वांत अवघड पदार्थ. पण तो पदार्थ करण्यात आता तिचा ‘पायखंडा’ आहे. 

धारदार सुऱ्या आणि इतर अत्याधुनिक उपकरणामुळे तिला स्वयंपाक करण्यात मोठी मदत होते. एमिली आपलं जगणं, स्वयंपाक करणं याबाबतचे व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमावर टाकते. ते शेखी मिरवण्यासाठी नाही. तर आपल्यासारख्या इतर लोकांचे जगणं सोपं करण्यासाठी. आपल्या उदाहरणातून लोकांना स्वावलंबी होण्याची दिशा मिळण्यासाठी.  अपंगत्व हेदेखील कसे आनंदी होऊ शकतं हे एमिली स्वत:च्या उदाहरणातून लोकांना दाखवून देत असते. 
एमिलीने नुकतीच साउर्दन  न्यू हॅम्पशायर विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे. तिथेच तिला पहिली नोकरीही लागली. तिथे ती फोरेन्सिक मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून लवकरच समुपदेशक होणार आहे. खांद्याच्या खाली दोन हात नसलेल्या एमिलीने आपण सामान्य माणसांपेक्षा वेगळे नाही, त्यांच्यापेक्षा कमीही नाही हे दाखवून दिले. 
 

Web Title: Emily, who has no hands, has immense 'hand' skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.