अचानक कर्मचाऱ्याच्या खात्यात आला २८६ महिन्याचा पगार; पैसे परत देतो म्हणाला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:01 PM2022-06-29T12:01:12+5:302022-06-29T12:01:28+5:30
चूक लक्षात आल्यानंतर कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली.
जर तुम्हाला एकाचवेळी २८६ महिन्याची सॅलरी खात्यात जमा झाली तर काय कराल? हा प्रश्न विचित्र वाटू शकतो कारण असं होण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु तरीही अशाप्रकारे एक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिलीच्या एका कंपनीतील कर्मचाऱ्याबाबत घडली आहे. ज्याठिकाणी कर्मचाऱ्याच्या खात्यावर चुकून कंपनीने २८६ महिन्याची सॅलरी एकाचवेळी टाकली आहे. मागील महिन्यात हा प्रकार घडला आहे.
गमतीशीर म्हणजे या कर्मचाऱ्याने सुरूवातीला कंपनीला हे पैसे परत देण्याचं आश्वासन दिले. परंतु त्यानंतर तो अचानक गायब झाला. कंपनीला जेव्हा चुकीची जाणीव झाली त्यांनी कर्मचाऱ्याला संपर्क केला. कर्मचाऱ्याने त्याला अतिरिक्त पैसे मिळाल्याचे कबुल केले आणि परत देतो अशी ग्वाही दिली. परंतु कर्मचाऱ्याने दिलेले वचन पूर्ण न करता तो गायब झाला. कंपनीचे पैसे घेऊन कर्मचारी फरार झाला. एकाचवेळी खात्यात इतके पैसे जमा झाल्याने कर्मचाऱ्याच्या नियत बदलली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना Consorcio Industrial de Alimentos कंपनीची आहे. चिलीतील सर्वात मोठ्या कंपनीपैकी ही एक कंपनी आहे. या कंपनीने मे महिन्याच्या सॅलरीत एका कर्मचाऱ्याला चुकून ५ लाख पेसो म्हणजे ४३ हजार रुपये ऐवजी १६.५४ कोटी पेसो म्हणजे १.४२ कोटी रुपये सॅलरी पाठवली आहे. जेव्हा कंपनीच्या मॅनेजमेंटनं रेकॉर्ड चेक केला. तेव्हा ही चूक कंपनीच्या लक्षात आली.
चूक लक्षात आल्यानंतर कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली. कंपनीने सांगितले की, चुकून एकाचवेळी २८६ महिन्याची सॅलरी पाठवली आहे. त्यामुळे अतिरिक्त पैसे पुन्हा कंपनीला परत द्या. परंतु असे घडले नाही. कंपनी वाट पाहत राहिली आणि कर्मचाऱ्याने पैशाऐवजी थेट राजीनामा पाठवला. सुरुवातीला कर्मचारी फरार झाला त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु काही दिवसांनी कर्मचाऱ्याशी बोलणं झाले तेव्हा तो पैसे परत करतो म्हणाला. मात्र २ जून रोजी कंपनीला त्याचा राजीनामा मिळाला.
कंपनी घेतेय कायदेशीर सल्ला
माहितीनुसार, आता कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग निवडला आहे. पैसे परत मिळण्याची वाट पाहत बसलेल्या कंपनीला कर्मचाऱ्याचा राजीनामा मिळाला. कर्मचारी पैसे घेऊन फरार झाला. त्यामुळे कंपनीने पैसे परत मिळवण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊन पैसे परत मिळावेत अशी कंपनीची मागणी आहे.