हेअर डाय लावणं तरूणाला पडलं महागात, सकाळी फुग्यासारखा फुगला होता चेहरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 02:39 PM2024-08-08T14:39:50+5:302024-08-08T14:40:20+5:30
Hair Dye Reaction : केसांना लावण्याआधी त्याने डायची पॅच टेस्ट केली नाही. म्हणजे थोड्या केसांना डाय लावून टेस्ट केली नाही. थेट पूर्ण केसांना त्याने डाय लावलं.
Hair Dye Reaction : आजकाल महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या होत असते. त्यामुळे लोक केस काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काही लोक डाय लावतात तर काही लोक केमिकल्सचा वापर करतात. याने केस काही दिवसांसाठी काळे तर होतात. पण यांचे काही साइड इफेक्ट्सही असतात. इंग्लंडमधील एका व्यक्तीवर हे साइड इफेक्ट्स दिसून आले. त्याने केस काळे करण्यासाठी डाय लावलं होतं. पण त्याच्यासोबत असं काही झालं ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल.
एका रिपोर्टनुसार, लॅंकशायरच्या ब्लॅकबर्नमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय यान ब्रिग्स गेल्या महिन्यात आईकडे गेला होता. त्याचे काही केस पांढरे झाले होते. अशात त्याच्या आईने त्याला केसांना लावण्यासाठी एक हेअर डाय दिलं. मात्र केसांना लावण्याआधी त्याने डायची पॅच टेस्ट केली नाही. म्हणजे थोड्यास केसांना डाय लावून टेस्ट केली नाही. थेट पूर्ण केसांना त्याने डाय लावलं.
सकाळी उठला तर....
त्याने केसांना डाय लावल्यावर जळजळ होऊ लागली होती. त्याला वाटलं की, हे असं होत असावं. रात्री त्याने डाय लावलं. सकाळी झोपेतून उठल्यावर त्याने आरसा बघितला तेव्हा त्याला धक्का बसला. त्याचं कपाळ, चेहरा पूर्ण सूजला होता. तरी तो ऑफिसला गेला. पण त्याला घरी परत पाठवण्यात आलं. कारण त्याची तब्येत बिघडली होती. तो लगेच डॉक्टरांकडे गेला. साइड इफेक्ट झाल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं.
काय होतं असं होण्याचं कारण?
जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठला तेव्हा त्याची हालत आणखी जास्त बिघडलेली होती. चेहरा आणखी जास्त सूजला होता. एका डोळ्याने तो बघूनही शकत नव्हता. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे टेस्ट केल्यावर समजलं की, त्याला paraphenylenediamine ने रिअॅक्शन झालं आहे. हे केमिकल हेअर डायमध्ये असतं. डॉक्टरांनी त्याला काही औषधं दिली. आता त्याची सूज उतरली असून तो बरा आहे.