नशीब फळफळलं! माजी सैनिकाला लागली 5 कोटींची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 09:43 AM2022-01-03T09:43:15+5:302022-01-03T09:43:54+5:30
Lottery : लॉटरी जिंकल्यानंतरही सामान्य जीवन जगणार असून लॉटरीमधील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी (social work) खर्च करण्यास असल्याचे या माजी सैनिकाने म्हटले आहे.
भिवानी : 'भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है', असे म्हटले जाते. हरयाणाच्या (Haryana) भिवानी जिल्ह्यात राहणाऱ्या माजी सैनिकासाठी ही म्हण लागू होते. कारण, त्यांनी जवळपास 5 कोटींची लॉटरी (Lottery) जिंकली आहे. या लॉटरीवरील 30 टक्के कर कापल्यानंतर त्यांना साडेतीन कोटी रुपये मिळतील. दरम्यान, लॉटरी जिंकल्यानंतरही सामान्य जीवन जगणार असून लॉटरीमधील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी (social work) खर्च करण्यास असल्याचे या माजी सैनिकाने म्हटले आहे.
हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील बरडू मुगल गावात राहणारे माजी सैनिक अत्तर सिंह यांनी नागालँड सरकारची पाच कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ते भारतीय लष्करात नायक म्हणून निवृत्त झाले असून गेल्या 15 वर्षांपासून लॉटरी खरेदी करत होते. आतापर्यंत लॉटरीवर जवळपास 10 लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यादरम्यान अनेक छोटी बक्षिसे जिंकली. मात्र 15 वर्षांच्या प्रयत्नानंतर आता त्यांनी पहिले मोठे बक्षीस जिंकले आहे.
2007 साली सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर काही काम करण्याचा विचार केला. त्यानंतर लॉटरी खरेदी करण्यास सुरुवात केली, असे अत्तर सिंह यांनी सांगितले. जवळपास सहा महिन्यांपूर्वीही 90 हजार रुपयांची लॉटरी लागली होती, मात्र ती समाधानकारक नव्हती. चांगली लॉटरी लागेपर्यंत आपण आपले प्रयत्न चालूच ठेवणार असा निर्धार मनात होता. आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही रक्कम खर्च करण्यासाठी अद्याप कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नाही, असे अत्तर सिंह यांनी सांगितले.
'पुन्हा कधीही लॉटरीची तिकिटे खरेदी करणार नाही'
सुरुवातीला जेव्हा पाहिले की तिकीट क्रमांक पहिल्या क्रमांकावर आला आहे, तेव्हा विश्वासच बसला नाही. सलग अनेक वेळा संख्या जुळवली. त्यानंतर, तिकीट देणाऱ्या एजन्सीच्या ऑपरेटरशी बोलून खात्री केली, त्यानंतर पाच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याची खात्री पटली, असे अत्तर सिंह यांनी सांगितले. आता स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आता आयुष्यात पुन्हा कधीही लॉटरीची तिकिटे खरेदी करणार नाही, असे अत्तर सिंह म्हणाले. त्यांच्यासोबत लॉटरी तिकीट एजन्सीचे ऑपरेटर लक्ष्मण सिंह हे सुद्धा उपस्थित होते. 24 डिसेंबर रोजी किल्लनवली येथून डिअर ख्रिसमस आणि न्यू इयर बंपर लॉटरीची पाच तिकिटे 10 हजार रुपयांना खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.