२५० आकाशपाळण्यांची युरोपातील ‘जत्रा’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 06:13 AM2021-10-15T06:13:10+5:302021-10-15T06:13:39+5:30
Fair In Europe: युरोपातही यंदा जगातील सर्वाधिक जुनी ‘जत्रा’ भरली आहे. इंग्लंडच्या किंग्स्टन अपॉन हल या शहरात हा मेळा सुरू झाला आहे. साधारण पावणे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातील ही ‘जत्रा’ युरोपातील सर्वांत पुरातन जत्रा मानली जाते,
यात्रेत, जत्रेत गेल्यावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू काय असतो?, सर्वांत पहिल्यांदा लक्ष कोणत्या गोष्टीकडे जातं?, लहान मुलं कशाचा हट्ट धरतात?
गावोगावच्या यात्रा आणि जत्रेची ठिकाणं लांबूनच ओळखू येतात, ती तिथे असलेल्या उंचच उंच आकाशपाळण्यांमुळे. या पाळण्यात बसण्यासाठी लहान मुलांची तर, झुंबड उडतेच, पण, मोठी माणसंही या निमित्तानं आपली हौस पूर्ण करून घेतात..पाळणा जितका उंच, तितकं त्यातलं थ्रिल जास्त, गंमत अधिक आणि त्याचा दरही अधिक!
युरोपातही यंदा जगातील सर्वाधिक जुनी ‘जत्रा’ भरली आहे. इंग्लंडच्या किंग्स्टन अपॉन हल या शहरात हा मेळा सुरू झाला आहे. साधारण पावणे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातील ही ‘जत्रा’ युरोपातील सर्वांत पुरातन जत्रा मानली जाते, कारण या जत्रेचं यंदाचं हे ७४३ वे वर्ष आहे. गेल्या वर्षी, २०२० मध्ये कोरोनामुळे ही जत्रा रद्द करण्यात आली होती. २०१९ मध्येही या जत्रेत नऊ लाखापेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली होती. यंदाही ही जत्रा धूमधडाक्यात सुरू झाली आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत ही जत्रा चालेल. केवळ युरोपातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील रसिक ही जत्रा अनुभवण्यासाठी येतात. यंदाही या जत्रेत दहा लाखांपेक्षा जास्त लोक येतील असा आयोजकांचा कयास आहे. या जत्रेचं सुरुवातीपासूनचं वैशिष्ट्य आहे ते, म्हणजे येथील आकाश पाळणे आणि झूले !
यंदा या जत्रेतील आकाशपाळण्यांची आणि झुल्यांची संख्या तब्बल २५० पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या आकार-प्रकारातील हे पाळणे चित्र-विचित्र पद्धतीनं हलतात, फिरतात... ती मजा घेण्यासाठीच जगभरातील लोक येथे गर्दी करतात.
आकाशपाळण्यांत बसायला सुरुवातीला काही जण घाबरतात, काहींना त्याच्या उंचीची भीती वाटते, तर, काहींना त्याच्या हलण्याची.. पण, आकाळपाळण्यांतली गंमत एकदा कळली की, जत्रेतला हा आनंद मोठी माणसंही सोडत नाहीत..
झुलत झुलत आकाशात जाणं, एका ‘सर्वोच्च’ टोकावरुन किड्यामुंग्यांप्रमाणे भासणाऱ्या खालच्या लोकांकडे अभिमानानं पाहाणं, पाळणा आकाशातून खाली येत असताना ‘अवकाशवीर’ ज्याप्रमाणे शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतात, तसा ‘वजनरहित’ अनुभव घेणं, ‘आइस्क्रिम’ चा गोळा पोटात ठेवल्याप्रमाणे पोटातल्या अविस्मरणीय ‘गारेगार’पणाची अनुभूती घेत बेंबीच्या देठापासून ओरडत खाली येणं आणि पुन्हा वर जाणं.. जे आकाशपाळण्यात बसले असतील, तेच त्याची महती जाणू शकतील !
युरोपातील या जत्रेची सुरुवात झाली १२७८ मध्ये ! या पहिल्या जत्रेतही आकाशपाळण्यांची संख्या होती तब्बल ८०! त्यानंतर दरवर्षी त्यात वाढच होत गेली. मार्चमध्ये भरणारी ही जत्रा नंतर ऑक्टोबरमध्ये भरायला लागली. यंदाच्या या जत्रेत काही भारतीयही सहभागी झाले आहेत.
सध्या जगातला सर्वांत मोठा आकाशपाळणा आता दुबईत तयार होतो आहे. त्याचं कामही जवळपास संपलं आहे. येत्या काही दिवसांत त्यात हजारो लोकं झुलताना दिसतील आणि त्याहीपेक्षा जास्त लोक त्याकडे माना वर करून बघताना देहभान विसरतील. जगातल्या या सर्वांत मोठ्या आकाशपाळण्यात एकाचवेळी सुमारे दोन हजार लोक बसू शकतील !, एवढंच नाही, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या पाळण्याची उंची आहे तब्बल ८२५ फूट आणि वजन आहे ९०० टन ! म्हणजे बोइंग ७४७ या जम्बो अशा पाच विमानांच्या एकत्रित वजनाइतकं!, हा आकाशपाळणा तयार करण्यासाठी जगातल्या सर्वांत मोठ्या क्रेनचाही वापर करण्यात आला. एकाचवेळी तब्बल १२०० मेट्रिक टन वजन उचलू शकेल अशी या क्रेनची क्षमता आहे.
या आकाशपाळण्याचं वैशिष्ट्य इथेच संपत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे २०२३ पासून या पाळण्याच्या निर्मितीचं काम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीसच हा पाळणा पूर्णपणे तयार होऊन रसिकांना वापरण्यासाठी खुला होणार होता, पण कोरोनामुळे त्याला काहीसा विलंब झाला. दुबईच्या ज्या ‘ब्लू वाॅटर’ आयलंडवर हा पाळणा उभारला जात आहे, ते बेटही नैसर्गिक नाही, माणसानं ते तयार केलं आहे!..
जगातला ‘उंच माझा झोका’!
हे झालं आकाशपाळण्यांबाबत, पण, जगातला सर्वांत उंच झोका कुठे आहे ? तो आहे न्यूझीलंडमध्ये. ‘नेविस स्विंग’ असं त्याचं नाव आहे. ‘क्विन्सटाऊन’ च्या दरीतील एका नदीवर हा झोका उभारलेला आहे. या झोक्याचेही दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे, आपण जसा पुढे-मागे झोका घेतो तसा. दुसरा प्रकार आहे खालून वर आणि वरुन खाली जाणारा झोका ! तब्बल ९०० फुटाच्या परीघात हा झोका फिरतो आणि त्याचा वेग आहे, ताशी १५० किलोमीटर ! बसायचंय या झोक्यात तुम्हाला?, पण, आयोजकांची ताकीद आहे, आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी परवानगी दिली तरी झोक्यावर बसताना ‘दिल थाम के बैठो!’..