चंद्रावर शेती आता शक्य होणार? वैज्ञानिकांनी उगवले चंद्रावर रोपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 07:05 PM2022-05-15T19:05:31+5:302022-05-15T19:06:03+5:30
चंद्राच्या मातीत प्रथमच झाड वाढवण्यात त्यांना यश आले आहे. ही माती काही काळापूर्वीच नासाच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती.
चंद्रावर मानवांची वसाहत करण्यासाठी वैज्ञानिक अनेक शोध लावत आहेत. याचदरम्यान अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्राच्या मातीत प्रथमच झाड वाढवण्यात त्यांना यश आले आहे. ही माती काही काळापूर्वीच नासाच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती.
चंद्रावरील शेतीच्या दिशेने पहिले पाऊल
कम्युनिकेशन्स बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोणतेही झाड केवळ पृथ्वीच्या मातीतच नाही, तर अवकाशातून आलेल्या मातीतही वाढू शकतात. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी चंद्राच्या रेगोलिथला वनस्पतींच्या जैविक प्रतिसादाचे परीक्षण केले. चंद्रावर अन्न आणि ऑक्सिजनसाठी शेती करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्रोफेसर अॅना-लिसा पॉल यांनी सांगितले की, या प्रयोगापूर्वीही चंद्राच्या मातीत वनस्पती वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर त्या झाडांवर केवळ चंद्राची माती शिंपडण्यात आली. अलीकडच्या संशोधनात ही वनस्पती चंद्राच्या मातीत पूर्ण वाढलेली आहे. संशोधकांनी झाडे वाढवण्यासाठी ४ प्लेट्स वापरल्या. यामध्ये असे पोषक तत्व पाण्यात मिसळले होते, जे चंद्राच्या मातीत सापडत नाहीत. यानंतर या द्रावणात अरेबिडोप्सिस वनस्पतीच्या बिया टाकल्या. काही दिवसातच या बियांनी लहान रोपाचे रूप धारण केले.
फक्त १२ ग्रॅम माती वापरली
नासाच्या अपोलो मोहिमेतील ६ अंतराळवीर ३८२ किलो वजनाचे दगड घेऊन चंद्रावरून पृथ्वीवर परतले. हे दगड शास्त्रज्ञांमध्ये वाटण्यात आले. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या म्हणण्यानुसार, ११ वर्षांत ३ वेळा अर्ज केल्यानंतर त्यांना नासाकडून १२ ग्रॅम माती मिळाली. एवढ्या मातीत काम करणे खूप अवघड होते, पण अखेरीस ते यात झाड वाढवण्यात यशस्वी झाले. अपोलो ११, १२ आणि १७ मोहिमेदरम्यान ही माती गोळा करण्यात आली होती.