संसदेत नेत्याने केला 'धमाकेदार' कारनामा, नाक दाबून बाहेर पळण्याची सदस्यांवर आली वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:51 PM2019-08-12T12:51:06+5:302019-08-12T13:02:38+5:30
वेगवेगळ्या विषयांवरून गोंधळ झाल्यावर संसद किंवा विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात येत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
(Image Credit : technology.inquirer.net) (प्रातिनिधीक फोटो)
वेगवेगळ्या विषयांवरून गोंधळ झाल्यावर संसद किंवा विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात येत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण केनियातील संसद सभागृहात असं काही झालं की, ज्यामुळे सगळेच हैराण झाले. सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आल्याचं हे अशाप्रकारचं पहिलंच कारण असेल. गेल्या बुधवारी येथील होमा बे काउंटी संसदेतील सभागृहात एका सदस्याने सोडलेल्या गॅसची दुर्गंधी अशी काही पसरली होती की, थेट सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं.
सभागृहात एका मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद सुरू होता. अचानक दुर्गंधी येऊ लागली. लगेच सर्व सदस्य नाक दाबून पेपरने हवा घेऊ लागले. पण दुर्गंधी इतकी जास्त होती की, तिथे बसणे कठीण झाले होते. मजेशीर बाब म्हणजे यादरम्यान सभागृहातील सदस्यांनी गॅस सोडण्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले. ज्यूलिअल गाया नावाचे एक सदस्य सभापतींना म्हणाले की, आपल्यापैकी एका सदस्याने सभागृहातील हवा प्रदूषित केली आहे.
त्यानंतर सभापती एडविन काकाछ यांनी चक्क १० मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहातील सदस्य बाहेर पळाले. सोबतच सभापतींनी तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना सांगितले की, इथे चांगलं रूम फ्रेशनर मारा. ते असंही म्हणाले की, व्हॅनिला असो वा स्ट्रॉबेरी कोणतही फ्लेवर असो, लगेच मारा. नंतर काही वेळाने दुर्गंधी कमी झाल्यावर सगळेच सदस्य आपापल्या जागेवर जाऊन बसले आणि सभागृहाचं कामकाज सुरू झालं.