मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:10 AM2021-09-29T11:10:23+5:302021-09-29T11:11:35+5:30
हा 7 फूट लांबीचा शार्क यूकेमध्ये पकडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे.
ब्रिटनमधील डेव्हॉनच्या किनाऱ्यावर एका मच्छीमाराने तब्बल सात फूटांचा शार्क मासा पकडून एक नवा रेकॉर्ड केलाय. डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटिश पाण्यात पकडलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शार्क मासा आहे. सायमन डेव्हिडसन असं शार्क पकडणाऱ्या मच्छीमाराचे नाव असून, हा मासा पकडण्यासाठी सायमनला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सायमनने आपल्या फेसबूकवर पोस्ट केलाय.
सायमन डेव्हिडसन आणि त्याच्या इतर सहा साथीदारांना या शार्कला त्यांच्या बोटीला बांधण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. शार्क मासा पकडल्याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत सायमन डेव्हिडसनने फेसबुकवर लिहिले, "मी 550lb पोरबीगल शार्क पकडण्यात यशस्वी झालो. याला पकडताना मी खूप थकलो पण आता मी खूप खूष आहे." दरम्यान, सायमनने या शार्क माशाला मारले नसून, त्याचे वजन केल्यानंतर पाण्यात परत सोडून दिले आहे.
एका रिपोर्टनुसार, यूकेमध्ये पकडलेल्या सर्वात मोठ्या पोरबीगल शार्कचा विक्रम मच्छीमार ख्रिस बेनेटच्या नावावर आहे. त्यांनी 1993 मध्ये 507 पौंड (230 किलो)चा शार्क मासा पकडला होता. ब्रिटीश मत्स्यव्यवसाय समिती त्यालाच अधिकृत रेकॉर्ड मानते. कारण, त्यावेळेस त्या शार्कला जमिनीवर आणून त्याचे वजन केले होते. पण, आता बहुतेक मच्छीमार शार्कला मारण्यास तयार नसतात, त्यामुळे पाण्यातच त्याचे वजन मोजले जाते.