भर पावसात चक्क घोड्यावरून फूड डिलिव्हरी; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:13 AM2022-07-05T08:13:22+5:302022-07-05T08:13:52+5:30
पावसात गाड्यांची ये-जा सुरू असताना पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसून रस्ता ओलांडणारा डिलिव्हरी बॉय व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मुंबई : घोड्यावर बसून मिरवणूक काढली जाते, रपेट केली जाते, शाही सोहळ्यांत घोडा मिरवला जातो. मात्र, घोड्यावर बसून चक्क फूड डिलिव्हरी केली जाते, हे प्रथमच घडत आहे. हा अजब प्रकार मुंबईत घडला आहे. एका ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीचा डिलिव्हरी बॉय चक्क भरपावसात घोड्यावर बसून ऑर्डर घेऊन जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पावसात गाड्यांची ये-जा सुरू असताना पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसून रस्ता ओलांडणारा डिलिव्हरी बॉय व्हिडीओमध्ये दिसत आहे. सहा सेकंदांचा हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण मुंबईच्या रस्त्यावरील हा व्हिडीओ असल्याचे सोशल मीडियात सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीदेखील दिसते आहे. मात्र, संबंधित फूड डिलिव्हरी कंपनीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Swiggy agent rides horse to deliver food amid heavy rain in Mumbai
— 🇮🇳 Rupen Chowdhury 🚩 (@rupen_chowdhury) July 4, 2022
🤣🤣 pic.twitter.com/yZya4gIBGW
प्रतिक्रियांचा पाऊस
फूड डिलिव्हरीसाठी चक्क घोड्याचा वापर पाहून नेटकऱ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या, पेट्रोल वाचवण्याची ही मस्त आयडिया आहे, अशा विविध मजेशीर प्रतिक्रियांसह सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.