...म्हणून 'त्या' चार न्हाव्यांना पाकिस्तानी पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:50 PM2019-10-05T12:50:32+5:302019-10-05T12:53:13+5:30
प्रत्येकाकडून पोलिसांनी वसूल केला ५ हजाराचा दंड
इस्लामाबाद: सध्या तरुणांमध्ये स्टायलिश दाढीची फॅशन आहे. जवळपास दर महिन्याला दाढीची नवी स्टाईल ट्रेंडमध्ये येते. त्यामुळे न्हावी वेगवेगळ्या स्टाईल शिकत असतात. मात्र पाकिस्तानात स्टायलिश दाढी करणं चार न्हाव्यांना चांगलंच महागात पडलं आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात हा प्रकार घडला.
पाकिस्तानात दाढीचा संबंध धर्माशी जोडला जातो. त्यामुळे स्टायलिश दाढी ठेवण्यावर निर्बंध आहेत. मात्र तरीही चार न्हाव्यांनी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांची स्टायलिश दाढी केली. यानंतर त्या चार न्हाव्यांना ताब्यात घेण्यात आलं. याशिवाय त्यांना ५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. स्टायलिश दाढी इस्लाम धर्माला मंजूर नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात दुकानदार संघटनेचा अध्यक्ष असलेली सामेन नावाची व्यक्ती पोलिसांना कारवाईत मदत करताना दिसत आहे.
🇵🇰Pakistanis forced to grow beards🧔🏽
— Rabwah Times (@RabwahTimes) October 4, 2019
👮🏽♂️Police detain barbers for 'violating ban' against styling of beards as it goes against Islam pic.twitter.com/pMB00XvEJ8
व्हिडीओमध्ये सामेन न्हाव्यांना स्टायलिश दाढी का केली, असा प्रश्न विचारताना दिसतो. काही दिवसांपूर्वी संघटनेनं दाढ्यांच्या स्टायलिश डिझाईनवर प्रतिबंध लागू केले होते. त्याची माहिती सर्व सलून चालकांना देण्यात आली होती. मात्र तरीही काही न्हावी स्टायलिश दाढी करताना दिसत असल्याचं सामेननं सांगितलं. पोलिसांनी चारही न्हाव्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.