चार वर्षाच्या मुलाने क्लासमधील मुलीला गिफ्ट दिले दोन सोन्याचे बिस्कीट आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:31 AM2024-01-10T10:31:58+5:302024-01-10T10:32:39+5:30
एका चार वर्षाच्या मुलाने सगळ्यांनाच हैराण केलं. त्याने त्याच्या किंडरगार्टनमधील एका मैत्रिणीला गिफ्ट म्हणून 20 तोळे सोनं दिलं.
Gold Biscuits : लहान मुलांच्या मैत्रीबाबत तुम्ही अनेक मजेदार आणि क्यूट गोष्टी ऐकल्या असतील. त्यांचं निरागस वागणं आणि बोलण ऐकत दिवस कसा निघून जातो कळतच नाही. पण कधी कधी ही लहान मुले असं काही करून जातात ज्याची कल्पनाही आपण करत नाही. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. लहान मुले आपली खेळणी, पेन्सील, चॉकलेट-बिस्कीट मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करतात. पण चीनमध्ये एका चार वर्षाच्या मुलाने सगळ्यांनाच हैराण केलं. त्याने त्याच्या किंडरगार्टनमधील एका मैत्रिणीला गिफ्ट म्हणून 20 तोळे सोनं दिलं.
बसला ना धक्का...20 तोळे सोनं म्हणजे दोन सोन्याची बिस्कीटे. इतकं सोनं मुलाने आपल्या मैत्रिणीला गिफ्ट दिलं. दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टनुसार, ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतात झाला. इथे किंडरगार्टनमध्ये एक छोटा मुलगा आपल्या मैत्रिणीच्या इतका प्रेमात पडला की, तो तिच्यासोबत जीवन जगण्याची स्वप्ने बघू लागला. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या घरातील दोन सोन्याची बिस्कीटे घेऊन आला. दोन्ही बिस्कीटे 100-100 ग्राम चे आहेत. मुलगी जेव्हा ही बिस्कीटे घरी घेऊन गेली आणि आई-वडिलांना दाखवली तर ते हैराण झाले.
यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी लगेच मुलाच्या आई-वडिलांना संपर्क केला आणि याबाबत सांगितलं. मुलाच्या आई-वडिलांनी मोकळेपणाने सांगितलं की, त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, हे सोन्याचे बिस्कीट त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी ठेवले आहेत. पण त्यांना याची कल्पना कल्पना नव्हती की, त्यांचा मुलगा हे सोन्याचे बिस्कीट न सांगता मुलीला देईल. या घटनेची सोशल मीडियावर आता चर्चा होत आहे. लहान मुलांना गिफ्ट देणं चांगलं नक्कीच आहे, पण त्यांचं महत्वही त्यांना सांगायला हवं. त्यांना शिकवायला हवं की, महागड्या वस्तू किंवा कोणत्याही वस्तू कुणालाही न विचारता अशा द्यायच्या नसतात.