स्वातंत्र्यांची गळचेपी, मुंबईत कॉलेजमध्ये मुलींच्या शॉर्ट्सवर बंदी
By Admin | Published: August 16, 2015 12:33 PM2015-08-16T12:33:35+5:302015-08-16T12:34:28+5:30
मुंबईतील ख्यातनाम सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने सुरक्षेचे कारण पुढे करत कॉलेजच्या मल्हार या फेस्टिव्हलमध्ये मुलींच्या शॉर्ट्स घालण्यावर निर्बंध घातले आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१६ - मुंबईतील ख्यातनाम सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने सुरक्षेचे कारण पुढे करत कॉलेजच्या मल्हार या फेस्टिव्हलमध्ये मुलींच्या शॉर्ट्स घालण्यावर निर्बंध घातले आहे. हे निर्बंध फक्त कॉलेजच्या मुलींसाठीच लागू असून फेस्टीव्हलमध्ये बाहेरच्या महाविद्यालयांमधून येणा-या मुलींवर ही बंदी लागू नाही.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा मल्हार हा फेस्टिव्हल नेहमीच कॉलेज युवकांमध्ये आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. १५ ऑगस्टपासून सुरु झालेला हा फेस्टिव्हल आज संपणार असून या फेस्टिव्हलसाठी कॉलेजने तयार केलेली नियमावली ही चर्चेचा विषय ठरली आहे. ४ ऑगस्ट रोजी कॉलेजचे प्राचार्य अँजेले मेन्जिस यांनी कॉलेजच्या १२०० विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यादरम्यान त्यांनी सुरक्षेचे कारण देत विद्यार्थिनींच्या शॉर्ट्सवर निर्बंध घातले. हा नियमपूर्वी यापूर्वीही लागू करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अनेक विद्यार्थिनींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. फेस्टिव्हलसाठी आम्ही दिवसरात्र अथक मेहनत घेतो, बॅनरपासून ते लाईट लावण्याच्या कामात मुलींचाही सहभाग असतो. एवढे काम असताना आम्ही जीन्स किंवा ट्राऊझर घालून काम कसं करणार असा सवाल एका विद्यार्थिनीने उपस्थित केला. तर पावसाळ्यात मुलींच्या शॉर्ट्स बंदी घालणे अयोग्य आहे असे अन्य एका विद्यार्थिनीने सांगितले.