ब्रिटनमध्ये आढळली बेडकांची स्मशानभूमी; शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणी आढळले तब्बल 8000 हाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 05:03 PM2022-06-19T17:03:15+5:302022-06-19T17:06:39+5:30
Viral News: पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात अनेक अवशेष मिळतात. पण, केंब्रिजमधील उत्खननात शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणाहून बेडकांची 8000 हाडे सापडली आहेत.
Viral News: ब्रिटनमधील केंब्रिजजवळ शास्त्रज्ञांना एक धक्कादायक गोष्ट सापडली आहे. येथील बार हिलवर रस्त्याच्या कडेला केलेल्या उत्खननादरम्यान शास्त्रज्ञांना 8,000 प्राचीन टॉड आणि बेडकांची हाडे सापडली आहेत. 2016-2018 दरम्यान लोहयुगात बांधलेल्या घराजवळ हे उत्खनन झाले. यादरम्यान 14 मीटर लांब आणि 6 फूट खोल खड्ड्यात ही हाडे सापडली. बेडकांच्या या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांना एक मीटर वरची माती आणि सबसॉईल खणून काढावी लागली. एकाच ठिकाणी इतके अवशेष सापडणे ही एक असामान्य आणि विलक्षण शोध आहे.
Scientists are toadly baffled by 8,000 ancient toad and frog bones that have been found in a ditch during an excavation.https://t.co/24j3B1UG6T
— IFLScience (@IFLScience) June 18, 2022
बेडकांच्या हाडांचे गूढ रहस्य
म्युझियम ऑफ लंडन आर्किओलॉजी-एमओएलएचे वरिष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ विकी इवेन्स म्हणतात की, लंडनमधील अनेक साइट्सवर काम करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात बेडूक कुठेही आढळले नाहीत. एकाच खड्ड्यातून एवढी हाडे मिळणे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही हाडे मुख्यतः बेडूक आणि टॉडची आहेत. अश्मयुगात अनेकजण बेडूक खात असत. मात्र, खड्ड्यात सापडलेल्या हाडांवर कोणतेही कापलेले किंवा जळण्याचे चिन्ह दिसले नाही. त्यामुळे लोकांनी हे बेडूक खाल्ले असे म्हणता येणार नाही. मात्र, बेडूक उकडले असते तरी त्याच्या खुणा सापडल्या असत्या.
या घटनेमागे अनेक सिद्धांत
जिथून हे अवशेष सापडले, तेथे जळलेल्या धान्याचे पुरावे मिळाले आहेत. यावरुन काही असे म्हणत आहेत की, त्या काळात लोक एकाच ठिकाणी पिक ठेवत असत. पिकांमुळे इतर कीटक तिथे आले असावेत आणि बेडूक त्यांना खायला आले असावेत. प्रागैतिहासिक काळातील बेडकांच्या या अवशेषामागे आणखी एक सिद्धांत दिला जातोय. तो म्हणजे, बेडूक प्रजनन करण्यासाठी या भागात आले असावेत आणि खड्ड्यात पडून अडकले असतील. कडाक्याच्या थंडीमुळे या बेडकांचा इथेच मृत्यू झाला असावा. बेडकांमध्ये काही रोग झाल्यामुळे असे घडले असावे असाही एक सिद्धांत आहे.