'या' झाडाचं फळ सोन्यापेक्षाही महाग, जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 03:56 PM2024-07-01T15:56:06+5:302024-07-01T15:57:05+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबाबत सांगणार आहोत ज्याचा वापर वेगवेगळ्या देशांमध्ये केला जातो.
जगात अशी अनेक झाडं, फुलं किंवा पानं आहेत ज्यांचा वापर औषधी म्हणून केला जातो. त्यामुळेच काही झाडांना किंवा त्यांच्या पाना-फुलांना आपण कल्पनाही करत नाही त्यापेक्षा जास्त किंमत मिळते. सगळ्याच झाडांना एक वेगळं महत्व असतं. सगळ्यांचं एक वैशिष्ट्य असतं. आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबाबत सांगणार आहोत ज्याचा वापर वेगवेगळ्या देशांमध्ये केला जातो.
आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबाबत सांगणार आहोत. ज्याच्या फळाची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे. या झाडाच्या बियांचा एका खास गोष्टीसाठी वापर केला जातो. त्यामुळे त्यांची किंमत जास्त आहे. हे झाड नेपाळमध्ये आढळतं आणि त्याचं नाव बोधिचित्त असं आहे. झाडाला सोन्याची खाण असं ही म्हटलं जातं.
बोधिचित्त हे झाड नेपाळसहीत आशियातील अनेक देशांमध्ये आढळतं. मात्र, नेपाळच्या कावरेपालनचोकमध्ये आढळणारी झाडं सगळ्यात चांगल्या क्वालिटीची मानली जातात. या झाडांची किंमतही इतर झाडांच्या तुलनेत तीन ते चार पटीने जास्त असते.
बोधिचित्त झाडाचं नाव दोन संस्कृत शब्द 'बोधि' आणि 'चित्त' मिळून बनलं आहे. बोधी म्हणजे ज्ञान आणि चित्त म्हणजे आत्मा. बौद्ध धर्मात या झाडाला खूप महत्व आहे. बरेच लोक या झाडाचा संबंध थेट गौतम बुद्धांशी जोडतात. नेपाळमधील स्थानिक लोक या झाडाला फेरेंगबा म्हणतात.
बोधिचित्त झाडाच्या बीया इतक्या महाग असण्याचं कारण म्हणजे या बियांपासून बौद्ध प्रार्थनेची माळा बनवली जाते. रिपोर्ट्सनुसार, या झाडापासून मिळालेल्या बीया एका सीझनमध्ये ९० लाख रुपयांनाही विकल्या जातात.
नेपाळमधील काही स्थानिक लोक बोधिचित्ताची माळ तयार करतात. या माळेसाठी लागणाऱ्या बीया १३ मिलीमीटर ते १६ मिलीमीटरच्या असतात. एका माहितीनुसार, या बीया ५० ते २०० डॉलरला विकल्या जातात.