गव्हाणी घुबडांनी थाटला फ्लॅटमध्ये संसार; झाडेच नाहीत तर घरटी करणार कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:36 AM2021-10-05T07:36:10+5:302021-10-05T07:36:45+5:30
दौंड येथील एनव्हायरमेंटल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक नचिकेत अवधानी यांनी या घुबडांची सुटका केली.
श्रीकिशन काळे
पुणे : पक्ष्यांची घरटी असणारी झाडे नष्ट करून त्या ठिकाणी मानवासाठी घरे बांधली जात आहेत. पक्ष्यांचे घर नष्ट झाल्याने गव्हाणी घुबडांनी चक्क एका फ्लॅटमध्ये आसरा घेऊन संसार थाटला. दोन वर्षांपासून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये चक्क चार घरटी दिसून आली. त्यात ८ गव्हाणी घुबडे होती. त्यांना वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये हलविले.
दौंड येथील एनव्हायरमेंटल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक नचिकेत अवधानी यांनी या घुबडांची सुटका केली. ते म्हणाले,‘‘ चौफुला केडगाव रोड जवळील ‘समृद्धी एन्क्लेव्ह’ या सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये मालक राहण्यासाठी तेथे येणार होते. तत्पूर्वी पाहणी केली असता घुबडाची चार घरटी व आठ घुबडे दिसली. त्यातील दोन घरटी वापरातील होती, तर बाकी दोन घरट्यातील पिल्लांनी नुकतेच घरटे सोडले असावे. घुबडाची एवढी मोठी संख्या मनुष्यवस्तीजवळ बघण्याची आमची ही पहिलीच वेळ होती.’’
आठपैकी एकाला अधिवासात सोडले
एकूण ८ गव्हाणी घबडांना वाचवून हा संघर्ष तात्पुरता थांबवला. ८ पैकी १ गव्हाणी घुबड हे पूर्ण वाढ झालेले होते, त्याला त्याच्या मूळ अधिवासात परत मुक्त केले व ७ छोट्या पिलांना दौंड तालुक्याच्या ‘रेस्क्यू’ वाइल्ड लाईफ ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
वृक्षांचे संवर्धन गरजेचे
केडगाव भागात जवळपास मोठे देशी वृक्ष दिसत नव्हते. गव्हाणी घुबड हे जास्त करून जुन्या झाडांच्या ढोलीत घर करतात. रस्ता रुंदीकरणात किंवा केडगावचा विकास करताना मोठी झाडे तोडली गेली व अशा घुबडांना राहण्यासाठी लागणारी जागा आपण नष्ट केली. त्यामुळे या गव्हाणी घुबडांनी या फ्लॅटचा वापर केला. म्हणून जुन्या देशी वृक्षाचे जतन करणे खूप महत्त्वाचे आहे, असे नचिकेत अवधानी यांनी सांगितले.