भूगोल, पाककला आणि पंतप्रधानपद
By Admin | Published: July 14, 2016 04:37 AM2016-07-14T04:37:12+5:302016-07-14T04:37:12+5:30
थेरेसा मे यांच्या रुपाने इंग्लंडला दुसऱ्या महिला पंतप्रधान लाभल्या आहेत. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर यांनी ८० चे दशक आपल्या कणखर भूमिकेमुळे गाजवले होते
ओंकार करंबेळकर
थेरेसा मे यांच्या रुपाने इंग्लंडला दुसऱ्या महिला पंतप्रधान लाभल्या आहेत. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर यांनी ८० चे दशक आपल्या कणखर भूमिकेमुळे गाजवले होते. आता थेरेसा यांच्याकडेही नव्या मार्गारेट थॅचर म्हणूनच पाहिले जाते. थेरेसा यांची तुलना यापूर्वीपासूनच मार्गारेट थॅचर यांच्याशी केली जाते. थेरेसा मे या पंतप्रधान झाल्यामुळे जर्मनीबरोबर युरोपातील आणखी एका महत्वाच्या देशाचे प्रतिनिधित्व महिलेकडे गेले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन निवडून आल्या तर तीन मोठ्या आर्थिक सत्तांची सूत्रे महिलांकडे असण्याचा अभूतपूर्व योग पाहायला मिळेल. थेरेसा यांचे पंतप्रधानपदी येणे आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नेमलेल्या त्या १३ व्या पंतप्रधान आहेत.
थेरेसा यांचा जन्म इस्ट ससेक्स प्रांतामध्ये इस्टबोर्न येथे झाला. त्यांचे वडिल ख्रिस्ती धर्मोपदेशक होते. आॅक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी भूगोलाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर बँक आॅफ इंग्लंडमध्ये नोकरी सुरु केली. मात्र याच काळात अपघातामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. तरुण वयातील थेरेसा यांच्यासाठी हा मोठा आघात होता. १९९७मध्ये त्यांनी मेडनहेड मतदारसंघामधून संसदेत प्रवेश केला. त्यानंतर एकेक पदांचा कार्यभार सांभाळत त्यांनी आपले राजकीय कौशल्य सिद्ध केले.
शिक्षण, वाहतूक, महिला आणि समानता, पर्यावरण, पर्यटन अशा अनेक विभागांसाठी शॅडो सेक्रेटरीपदी त्यांची पक्षाने निवड केली. १२ मे २०१० रोजी त्या होम सेक्रेटरी झाल्या. गेल्या शंभर वर्षांमध्ये होम सेक्रेटरी पदावर इतका मोठा काळ असण्याचा मान थेरेसा यांच्यापूर्वी एकाच व्यक्तीला मिळाला होता. डेव्हीड कॅमेरून यांनी पदावरुन बाजूला होण्याचे निश्चित केल्यानंतर ११ जुलै २०१६ रोजी त्यांची कॉन्झर्व्हेटिव पक्षाच्या नेतेपदी निवड होऊन आता त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. ब्रेक्झीटमुळे डेव्हीड कॅमेरुन पदावरून उतरत असले तरी थेरेसा यांच्यावर ब्रेक्झिटोत्तर इंग्लंडची धोरणे ठरविण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर मे यांना आता कॅबिनेट सदस्य जाहीर करावे लागणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचे काम म्हणजे युरोपीय महासंघातून इंग्लंड बाहेर पडण्याची प्रक्रिया सांभाळावी लागेल. ब्रेक्झीटच्या मतदानामध्ये देशामध्ये दोन विचारप्रवाह ठळकपणे समोर आले आता थेरेसा यांना या दोन्ही विचारप्रवाहांना एकत्र ठेवून देश चालवावा लागणार आहे. अर्थव्यवस्थेसमोर असणारी आव्हानांनाही याबरोबरच तोंड द्यावे लागणार आहे. त्या एक कणखर नेत्या असून त्यांच्या पंतप्रधान होण्याने मला आनंद झाला आहे अशा शब्दांमध्ये मावळते पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बेनझीर भुट्टोंनी करुन दिली ओळख
आॅक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकत असताना १९७६ साली कॉन्झव्हेर्टिव्ह डान्स असोसिएशनमध्ये बेनझीर भुट्टो यांनी थेरेसा यांची ओळख फिलिप मे यांच्याशी करून दिली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि थेरेसा व फिलिप यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याला अपत्य नाही. थेरेसा आणि फिलीप यांची भेट घडवून आणणाऱ्या बेनझीर नंतर पाकिस्तानच्य पहिला महिला पंतप्रधान झाल्या आता थेरेसाही इंग्लंडच्या पंतप्रधान होत आहेत, ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. थेरेसा यांना पाककलेचीही आवड आहे. पाककृतींची त्यांच्याकडे १०० पुस्तके असल्याचे त्या सांगतात. थेरेसा मे या त्यांच्या हाय हिल्स शूज मुळेही फार प्रसिद्धी झोतात आल्या. त्यांच्या लेपर्ड प्रिंटचे (बिबळ््याच्या कातड्यावरील ठिपक्यांप्रमाणे) शूज विशेष चर्चेमध्ये आले होते. आज पंतप्रधान झाल्यावरही त्यांचे शूज प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत.
थेरेसा मे
जन्म: १ आॅक्टोबर १९५६
मेडनहेड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत
२०१० पासून होम सेक्रेटरी
२०१६ पासून पंतप्रधान