बाबो! डिलिव्हरीनंतर असा काही आनंद कपलला झाला, टॅक्सीमध्येच विसरून आले नवजात बाळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 04:50 PM2019-05-23T16:50:20+5:302019-05-23T16:50:56+5:30
जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये एका अजब घटना घडली आहे. इथे एक कपल बाळाच्या डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये एका अजब घटना घडली आहे. इथे एक कपल बाळाच्या डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. महिलेने एका मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर कपल टॅक्सीने घरी परतत होतं. पण अति-उत्साहात तो बाळाला टॅक्सीमध्येच विसरून घरी पोहोचले. हॅम्बर्ग पोलिसांना स्वत: या घटनेचा खुलासा केला आहे.
पोलिसांनी फेसबुक शेअर केली माहिती
सोशल मीडियात शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, हे या कपलचं दुसरं बाळ होतं. दोघेही फार आनंदी होते. महिलेला हॅम्बर्ग रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिलिव्हरीनंतर नवरा-बायको दोघेही बाळाला घेऊन टॅक्सीने घरी जात होते. पण घराजवळ पोहोचताच नवरा-बायको दोघेही टॅक्सीमधून उतरून निघून गेले. त्यांचा एक वर्षाचा मोठा मुलगाही त्यांच्यासोबत गेला. पण ते नवजात बाळाला टॅक्सीतच विसरले.
आठवलं तेव्हा झाला होता उशीर
कपलने सांगितले की, ते बाळाच्या जन्मामुळे फार आनंदी होते आणि आनंदाच्या भरात ते विसरले. पण जेव्हा ते टॅक्सी सोडत होते, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं होतं की, काहीतरी महत्त्वाचं विसरलो आहोत. पण जोपर्यंत त्यांच्या लक्षात आलं की, ते त्यांच्या नवजात बाळालाच टॅक्सीमध्ये विसरले तेव्हा उशीर झाला होता. टॅक्सी ड्रायव्हर गाडी घेऊन पुढे गेला होता.
गाडी पार्किंगला लाऊन जेवायला गेला ड्रायव्हर
असे सांगितले जात आहे की, बाळाचे वडील टॅक्सीमध्ये धावत गेला, पण गाडी फार पुढे निघून गेली होती. अशात पोलिसच एकमात्र आधार होते. कपलने पोलिसात तक्रार दिली. यादरम्यान ड्रायव्हरला सुद्धा जाणीव झाली नाही की, गाडीच्या मागच्या सीटवर एक नवजात बाळ आहे. त्याने गाडी पार्किंगला लावली आणि तो जेवायला गेला.
बाळ गपचूप झोपलं होतं
दरम्यान पोलिसांनी तातडीने बाळाची शोध मोहिम सुरू केली. टॅक्सी अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये लावली होती. तर पोलीस तासंतास टॅक्सी रस्त्यावर शोधत होते. जेवण झाल्यावर ड्रायव्हरने टॅक्सी काढली आणि तो एअरपोर्टकडे जाऊ लागला. यावेळी ड्रायव्हरची नजर मागच्या सीटवर गेली. तेव्हा बाळा आरामात झोपलं होतं आणि काही आवाजही करत नव्हतं.
टॅक्सी नव्या पॅसेंजरजवळ पोहोचली. जसा पॅसेंजरने टॅक्सीचा दरवाज उघडला, बाळ रडू लागलं. टॅक्सी ड्रायव्हरला काय करावं हे कळत नव्हतं. नंतर त्याच्या लक्षात आलं की, आधीचे पॅसेंजर बाळाला टॅक्सीत विसरून गेले. टॅक्सी ड्रायव्हरने तेच केलं जे एका सभ्य व्यक्तीने केलं असतं. त्याने पोलिसांना फोन केला आणि याबाबत सांगितले. पोलीस आधीच बाळाचा शोध घेत होते. पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी बाळ त्याच्या आई-वडिलांकडे सोपवले.