वाहन परवाना मिळवला अन् अवघ्या ४९ मिनिटांत गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 04:14 PM2018-11-22T16:14:43+5:302018-11-22T16:16:09+5:30
वाहन परवाना मिळाल्याचा आनंद काही मिनिटंच टिकला
बर्लिन: एक तरुण वाहतूक पोलिसांच्या चाचणीत उत्तीर्ण झाला. मात्र अवघ्या तासभराच्या आत त्याला वाहन परवाना गमवावा लागला. जर्मनीच्या हेमेरे भागात ही घटना घडली आहे. १८ वर्षांचा तरुण वाहन परवाना मिळाल्यानंतर घरी परतत होता. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी अडवली आणि नियमभंग केल्याबद्दल दंडदेखील वसूल केला. याशिवाय त्याचा परवानादेखील रद्द केला.
हेमेरमध्ये राहणारा १८ वर्षांचा तरुण वाहन परवाना चाचणी देऊन घरी परतत होता. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानं त्याला वाहतूक पोलिसांनी परवानादेखील दिला होता. मात्र वाहन परवाना मिळाल्यानं त्याला झालेला आनंद अवघी काही मिनिटंच टिकला. घरी जात असताना या तरुणाची गाडी वाहतूक पोलिसांनी अडवली आणि स्पीड गनच्या मदतीनं त्याच्या गाडीचा वेग तपासला. यामध्ये त्यानं दोनवेळा गाडी मर्यादेपक्षा अधिक वेगानं चालवल्याचं दिसून आलं. तरुणानं ६० मैल प्रति तास वेगमर्यादा असलेल्या भागातून ९५ मैल प्रति तास वेगानं गाडी चालवली होती. तर ३० मैल प्रति तास वेगमर्यादा असलेल्या क्षेत्रातून ५० मैल प्रति तास वेगानं गाडी पळवली होती.
तरुणानं केलेल्या वेगमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल पोलिसांनी त्याच्याकडून २०० युरोजचा दंड वसूल केला. यासोबतच त्याचा वाहन परवानादेखील काढून घेतला. चार आठवड्यानंतर त्याला हा परवाना परत देण्यात येईल. 'काही गोष्टी कायमस्वरुपी टिकतात. तर काही तासभरदेखील टिकत नाहीत,' असं पोलिसांनी त्याच्या दंडाच्या पावतीवर लिहिलं. तरुण मुलासोबत गाडीत त्याचे चार मित्र होते. वाहन परवाना मिळाल्यानं मित्रांना आपलं वाहन चालवण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी तरुणानं कार वेगात चालवली असावी, अशी शक्यता विभागीय पोलीस अधिकारी मार्कशर क्राईस यांनी व्यक्त केली.