अरे व्वा! खेळता खेळता चिमुकल्याला सापडली 1800 वर्षे जुनी अनोखी गोष्ट; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:31 PM2023-08-30T12:31:30+5:302023-08-30T12:32:32+5:30
एका शाळकरी मुलासोबत घडलं जेव्हा त्याला शाळेत खेळताना काहीतरी सापडलं जे तिथे कसं पोहोचलं हे समजण्यापलीकडे आहे.
कधी कधी काही अनोख्या आणि अत्यंत दुर्मिळ गोष्टी अशा ठिकाणी सापडतात ज्याचा आपण विचारही केला नसेल. असंच काहीसं एका शाळकरी मुलासोबत घडलं जेव्हा त्याला शाळेत खेळताना काहीतरी सापडलं जे तिथे कसं पोहोचलं हे समजण्यापलीकडे आहे. एका आठ वर्षांच्या मुलाला सँडबॉक्समध्ये खेळताना एक अत्यंत दुर्मिळ चांदीचं नाणं सापडलं, जे त्याच्या जन्माच्या सुमारे 1,800 वर्षांपूर्वीचं आहे. बर्जन नावाचा मुलगा जर्मनीतील त्याच्या प्राथमिक शाळेत सँडबॉक्समध्ये खेळत असताना त्याला नाणं सापडलं.
नाणं मिळाल्यावर, त्याने ते उत्तर जर्मन शहर ब्रेमेनमधील आपल्या कुटुंबाला दाखवण्यासाठी घरी नेलं. Bjarne च्या पालकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी पुष्टी केली की हे नाणं रोमन साम्राज्याच्या काळात बनवलं गेलं होतं. जारी केलेल्या विधानानुसार, हे नाणं सम्राट मार्कस ऑरेलियस अँटोनिनसच्या कारकिर्दीत तयार केलेलं असून रोमन डेनारियस म्हणून ओळखलं गेलं. हे नाणे 1800 वर्षे जुनं होतं.
राज्य पुरातत्वशास्त्रज्ञ उटा हाले यांनी सांगितले की, नाण्याचं वजन 2.4 ग्रॅम आहे. रोमन साम्राज्याने चलनवाढीचा थेट परिणाम म्हणून चांदीचे प्रमाण कमी केलं तेव्हा ते तयार झालं. हालेने हा शोध "काहीतरी खास" असल्याचं म्हटलं आहे. द हिस्ट्री ब्लॉगच्या मते, येथे चाउसी, एक प्राचीन जर्मनिक जमात वस्ती होती जी बहुतेकदा प्राचीन रोमन लोकांशी व्यापार करत होती, ज्यामुळे हे नाणे मातीत कसं गाडलं गेलं हे स्पष्ट केलं जाऊ शकतं.
ब्रेमेन मोन्युमेंट्स प्रोटेक्शन अॅक्टनुसार, बर्जन आपल्याकडे नाणं ठेवू शकत नाही कारण अशी नाणी राज्याची मानली जातात. असे असले तरी, राज्य पुरातत्वशास्त्रज्ञांनी मुलाची त्याच्या "सतर्कता आणि कुतूहल" साठी प्रशंसा केली आहे आणि विधानानुसार त्याला दोन पुरातत्व पुस्तकं बक्षीस देण्याची योजना आहे. हाले म्हणाले की त्यांना आशा आहे की, या नाण्याला ब्रेमेनच्या फोके संग्रहालयात स्थान मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.