‘झुमका मिला रे'...पण बरेली आणि झुमक्याचा नेमका संबंध काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:37 PM2020-02-11T12:37:30+5:302020-02-11T12:46:39+5:30
तुम्ही बरेलीला कधी गेले असो वा नसो तुम्ही ‘झुमका गिरा रे, बरेली के बाज़ार में' हे गाणं नक्कीच ऐकलं असेल.
तुम्ही बरेलीला कधी गेले असो वा नसो तुम्ही ‘झुमका गिरा रे, बरेली के बाज़ार में' हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. हे गाणं ऐकून अर्थातच झुमक्याचं आणि बरेलीबाबतची उत्सुकता वाढते. हे गाणं १९६६ मध्ये आलेल्या 'मेरा साया' सिनेमात अभिनेत्री साधनावर चित्रित करण्यात आलं होतं. आता तुम्ही म्हणाल आता या गाण्याची इतकी का चर्चा होत आहे? तर बरेलीमध्ये झुमका लावण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील बरेली हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. याच बरेलीला आता झुमका मिळाला आहे. झुमक्यामुळे बरेलीला मिळालेली ओळख पाहता इथे पितळेचा एक मोठा झुमका लावण्यात आला आहे. जिथे हा झुमका लावण्यात आला त्या ठिकाणाचं नाव तिराहा असं ठेवण्यात आलंय. आता लोक आनंदी झाले असून यासोबत सेल्फी घेत आहेत.
हा झुमका साधारण २ क्विंटल वजनाचा असून वीस फूट लांब एका पोलवर लावण्यात आला आहे. हा झुमका पितळ्याचा तयार करण्यात आलाय. त्यावर एक हुकही लावण्यात आलीये. गुरूग्रामच्या एका कलाकाराने हा झुमका तयार केलाय. असे बोलले जात आहे की, हा झुमका तयार करण्यासाठी ६० लाख रूपये खर्च आलाय.
मुळात झुमका आणि बरेलीचा तसा काहीच संबंध नाही. पण गाण्यातून बरेलीला चांगलीच ओळख मिळाली. त्यामुळे याचा फायदा करून घेण्यासाठी इथे झुमका लटकवण्याचा विचार पहिल्यांदा १९९० मध्ये समोर आला होता. पण त्यावेळी फंड न मिळू शकल्याने काम रखडलं होतं. पण आता हे काम पूर्ण करण्यात आलं आहे.
गाण्यामुळे लोकांना असं वाटतं की, इथे वेगळ्या प्रकारचे झुमके मिळतात. इतकंच काय तर गाण्यामुळेच या शहराला मोठी प्रसिद्धी मिळाली. पण India Today सोबत बोलताना स्थानिक ज्वेलर्स पी.के.अग्रवाल म्हणाले की, 'लोक बरेलीमध्ये येऊन झुमके शोधतात. पण बाहेर जे झुमके मिळतात तेच इथे मिळतात हे त्यांना आम्ही सांगावं कसं असा प्रश्न आम्हाला पडतो. आम्ही वेगवेगळ्या डिझाइनचे झुमके ठेवतो, जेणेकरून कस्टमर नाराज होऊ नयेत'.